अर्धशतकी भागीदारीवर पावसाचे पाणी
| कॅनबरा | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी-20 मालिकेतील पहिला सामना कॅनबरामधील मनुका ओव्हल स्टेडियमवर बुधवारी (दि.29) खेळिवण्यात आला. यावेळी भारताच्या सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. भारताने 9.4 षटकात 1 बाद 97 धावा केल्या आणि त्यांच्या आक्रमक खेळीवर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले की, भारतीय संघाला प्रथम फलंदाजीच करायची होती. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. अभिषेक नेहमीप्रमाणे त्याच्या शैलीत आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने सुरुवातीपासूनच मोठे शॉट्स खेळले होते. परंतु, त्याला चौथ्या षटकात 19 धावांवर माघारी फिरावे लागले. त्यानंतर सूर्यकुमार यादव गिलला साथ देण्यासाठी आला. परंतु, 5 व्या षटकानंतर पावसामुळे पहिल्यांदा सामना थांबवण्यात आला. त्यानंतर साधारण पाऊण तासाने पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर 18-18 षटकांचा सामना करण्यात आला होता. त्यानंतर दोघंही आक्रमक खेळत होते. या दरम्यान सुर्यकूमारने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 षटकारही पूर्ण केले. गिल आणि सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारीही केली होती. परंतु, 10 व्या षटका दरम्यान ही पुन्हा जोरात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा सामना थांबवण्यात आला. अखेर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर सामना सुरू होण्याच चिन्ह नसल्याने अखेर सामनाधिकाऱ्यांनी हा सामना रद्द केला.
