| पॅरिस | वृत्तसंस्था |
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाला 3-2 असे पराभूत केले आणि 1972 नंतर भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात हा विजय मिळवला. गोलरक्षक पी आर श्रीजेश याने पुन्हा एकदा त्याला अभेद्य भिंत का म्हणतात, हे सिद्ध करून दाखवले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘ब’ गटातील साखळी सामना खेळला गेला. भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान आधीच पक्के केले आहे, परंतु त्यांचे गटातील स्थान या लढतीपूर्वी निश्चित नव्हते. त्यांना उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांच्यापैकी एकाशी भिडावे लागेल. भारतीय चौथ्या स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यास त्यांना दुसऱ्या गटातील अव्वल संघाविरुद्ध खेळावे लागणार होते. आज ऑस्ट्रेलियाला नमवून त्यांना गटात अव्वल दोनमध्ये स्थान पटकाण्याची संधी होती.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ केला. 5व्या मिनिटाला क्रेग थॉमसचा गोलप्रयत्न गोलरक्षक पी आर श्रीजेशने हाणून पाडला. 12व्या मिनिटापर्यंत ऑस्ट्रेलियन्सचे 3-4 गोलसाठीचे प्रयत्न रोखण्यात श्रीजेशला यश मिळाले होते. 12व्या मिनिटाला भारताकडून हल्लाबोल झाला. ललित उपाध्यायचा गोलच्या दिशेने जाणारा चेंडू ऑसी गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडू रिबाऊंडमध्ये अभिषेककडे गेला आणि भारतीय खेळाडूने अविश्वसनीय मैदानी गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नवर भन्नाट गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या 10 मिनिटांत त्यांनी भारतीय बचावफळीची कसोटी घेतली. 25व्या मिनिटाला मनप्रीतने गोलजाळीत जाणारा चेंडू चतुराईने रोखला, परंतु रेफरीने ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर दिला. यावर खरं तर ऑसी खेळाडूचा शॉट चुकला होता, परंतु त्यांनी सांघिक खेळ करून पहिला गोल मिळवला. क्रेग थॉमच्या गोलने ऑस्ट्रेलियाने पिछाडी 1-2 अशी कमी केली. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचे पुनरागमनाचे सर्व प्रयत्न भारतीयांनी हाणून पाडले. 32व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हरमनप्रीतने त्यावर आणखी एक सुरेख गोल करून भारताची आघाडी 3-1 ने मजबूत केली. 41व्या मिनिटाला ऑसी खेळाडूंनी चांगली रणनीती आखताना गोलसाठी संधी निर्माण केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांचा ताळमेळ चुकला. 53व्या मिनिटाला अभिषेकने केलेला गोल ग्राह्य धरला गेला नाही. 55 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला स्ट्रोक मिळाला आणि ब्लॅक गोव्हर्सने गोल करून पिछाडी 2-3अशी कमी केली. शेवटच्या पाच मिनिटांत ऑस्ट्रेलियाने पुनरागमासाठी जोरदार प्रयत्न केले. पण भारताने 3-2 असा विजय पक्का केला.