। नाशिक । वृत्तसंस्था ।
मी दहा वर्षांत काय केले? अशी टीका पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री करत आहेत. मी कृषिमंत्री असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलण्याचा त्यांचा डाव इंडिया आघाडीने उधळून लावला. महाविकास आघाडीकडून स्त्रियांना मोफत एसटी प्रवास, बेरोजगारांसाठी चार हजारांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली खरी,दुसरीकडे तीन महिन्यांत 973 महिलांवर अत्याचार झाल्याची विदारक आकडेवारीही समोर आली आहे. महिला वर्गाचे रक्षण आणि संरक्षण करण्याऐवजी सत्ताधारी महायुतीने बघ्याची भूमिका घेतली आहे. सातशे शेतकर्यांच्या आत्महत्यांमुळे राज्याची अवस्था काय सांगावी? अशा शब्दांत त्यांनी व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.
पवार म्हणाले, पाच वर्षांत टेक्स्टाईल पार्क झालेले नाही. कापसाला भाव मिळाला नाही. सरकार तुमच्या हातात असताना टेक्स्टाईल पार्क करू अशा घोषणा करण्यात आल्या पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव द्यावा म्हणून त्यांनी आंदोलन केले. मात्र आता किती भाव? कापसाच्या भावासाठी आंदोलन करणारे तुमच्या तालुक्याचे मंत्री आता एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असताना कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार हजार रुपये किमान भाव होता. मात्र आता भाव पडले आहेत, असे ते म्हणाले.