चंद्रावर अवतरला भारत

ऐतिहासिक चांद्रयान सुखरुप आणि सुस्थळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

23 ऑगस्ट 2023 …देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवण्याचा दिवस ठरला. भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम नियोजित वेळेत पूर्ण झाली आणि अवघ्या देशवासियांनी एकच जल्लोष करीत ‌‘भारतमाता की जय’चा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. अवघ्या जगाला हेवा वाटावा असा ऐतिहासिक प्रसंग याचि देही, याचि डोळा पाहण्याचे स्वप्न साकारले. चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे.भारताच्या चांद्रयान मोहिमेचा प्रारंभ 14 जुलैला करण्यात आला होता.आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती.ती मोहीम 40 दिवसात पूर्ण करण्यात आली.

उत्सुकता शिगेला
संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासूनच अवघ्या भारतामध्ये चांद्रयान उतरण्याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. याचे सर्वच वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण सुरु असल्याने साऱ्यांच्या नजरा टीव्हीकडे लागून राहिल्या होत्या. प्रत्येक भारतीयाच्या छातीत अनामिक धडधड सुरु झाली. इस्रोने याचे थेट प्रक्षेपण करण्याबरोबरच त्याचे समालोचनही केल्याने चांद्रयानाच्या क्षणोक्षणी काय हालचाली सुरु आहेत, हे ऐकविले जात होते. त्यामुळे त्याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती.इस्रोने दिलेल्या नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारतीय चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले आणि तमाम भारतीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक केले. बंगळुरु येथे इस्त्रोच्या मुख्य कार्यालयात तर उपस्थित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर अक्षरशः ओसंडून वाहात होता. एक मोहीम यशस्वी केल्याचा अभिमान या सर्वांना वाटत होता.

भारत चंद्रावर पोहोचला
या ऐतिहासिक क्षणाची माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन दिली. भारत चंद्रावर पोहोचला अशा मोजक्याच शब्दांत त्यांनी मोदींना आपण यशस्वी ठरल्याचं सांगितलं.

मी चंद्रावर सुखरुप पोहोचलो…
इस्रोला पहिला एसएमएस
भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. त्यामध्ये ‌‘मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण’ असा मजकूर आहे.

शेवटची वीस मिनिटे

5.34 वाजता : लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीमदेखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली.

पॉवर डिसेंटला सुरुवात!
5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं यानाच्या वाहनाला उंचावरुन खाली उतरण्याची आज्ञा दिली. दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा वेग कमी करण्याचा होता.

रफ ब्रेकिंग फेज पूर्ण

5.56 वाजता : वाहनाची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 कि.मी. उंचीवर नेण्यात आले, हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.
5.57 वाजता : रफ ब्रेकिंग फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली. यामध्ये वेग अतिशय कमी केला जाणार होता.
5..59 वाजता : वगे कमी करण्याचा टप्पा अगदी आरामात पार पडला. त्यानंतर शेवटचा टप्पा आला.
6.03 वाजता : चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर चंद्रावर अवतरणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

यूट्युबवर विक्रमी नोंद
इस्त्रोने या मोहिमेचं यूट्यूबवरुन लाईव्ह प्रेक्षपण केले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले. चांद्रयान-3 च्या लँडिंगचे दृश्य 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी यूट्यूबवरुन पाहिले. हा जागतिक विक्रम झाला आहे. इस्त्रोच्या यूट्यूबने स्पेनच्या
इबाईचा विक्रम मोडीत काढला आहे. इबाईच्या यूट्यूबला 34 लाख लोकांना एकाच वेळी पाहिले होते. हा विक्रम मोडीत निघाला आहे.

जीवन धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा अभूतपूर्व क्षण आहे. आज भारतामधील प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-3 च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. शास्त्रांच्या अथक परिश्रमामुळेच आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यात यशस्वी झालोय. असा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश आहे. आपण जमिनीला आई आणि चंद्राला मामा म्हणतो. चांदो मामा खूप दूर आहे, असे म्हटले जात होते. पण आता असाही दिवस येईल, चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे, असे मुलं म्हणतील.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश पुढे जावा यासाठी इस्त्रोसह अन्य संस्थांची स्थापना केली. त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांचे आज चीज झाल्याचं मला वाटतं. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी जगाला दाखवलं की, भारत एक पुढे जाणारा देश आहे

शरद पवार, खासदार

जगाचे भारताकडे लक्ष होते. दक्षिण धु्रवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील अभिनंदन केले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी पाठबळ पुरवण्याचे काम केले. आज आपला देश महासत्तेकडे जात आहे. महासत्तेकडे जात असताना चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग पहिलं पाऊल आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Exit mobile version