न्यूझीलंडनी भारताला हरवले
| मुंबई । वृत्तसंस्था ।
रविवारी क्रॉसओव्हर मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-5 ने पराभूत झाल्याने भारत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये सडन डेथ दरम्यान समशेर सिंगचा गोल चुकला आणि भारतीय क्रीडा चाहत्यांना 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपची आठवण झाली.
न्यूझीलंडनी नॉकआऊट सामन्यात पुन्हा एकदा भारताचा पराभव करत तब्बल 47 वर्षांनंतर विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. भारताने आतापर्यंत 1975 मध्ये फक्त एकदाच हॉकी विश्वचषक जिंकला आहे. 2021 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाने चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले. अशा स्थितीत संघ यंदा दुष्काळ संपवेल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही.
भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यासह 1975 नंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले आहे. क्रॉसओव्हर मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. टीम इंडियाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार सेव्ह केले. असे असूनही भारताला विजय मिळवता आला नाही.
क्रिकेटमधील स्वप्नही तुटले
हॉकीप्रमाणेच न्यूझीलंडने क्रिकेटमध्येही भारताचे स्वप्न भंगले आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया दमदार खेळ दाखवत होती. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पराभव झाला होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सर्वांना आठवला. धोनीला मार्टिन गप्टिलने धावबाद केले आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला.