भारताचा सराव पक्का

बांग्लादेशचा केला मोठा पराभव

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकाच्या एकमेव सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. भारताने ठेवलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 122 धावाच करता आल्या. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, शिवम दुबे यांनी चांगला मारा केला. तर, फलंदाजीत ऋषभ पंतने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्या देखील फॉर्ममध्ये आला असून त्याने 23 चेंडूत 40 धावा चोपल्या. त्याने 4 षटकार अन् 2 चौकार मारले. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणार्‍या भारताने आपले कॉम्बिनेशन सेट करण्याच्या दृष्टीने अनेक पर्याय चाचपून पाहिले. रोहित शर्माने ऋषभ पंतला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत एक प्रयोग केला. हा प्रयोग जवळापस 500 पेक्षा जास्त दिवसांनंतर भारतीय जर्सी घालून मैदानावर उतरणार्‍या ऋषभ पंतने सार्थ ठरवला. त्याने 32 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डाव पुढे नेला. पांड्याने तर तुफान फटकेबाजी करत आयपीएलमधला पांड्या वेगळा अन् भारतीय संघाकडून खेळतानाचा हार्दिक पांड्या वेगळा असतो हे जणू सिद्धच करून दाखवलं. त्याने आपल्या 40 धावांच्या खेळीत 32 धावा या चार षटकार आणि दोन चौकार मारत वसून केल्या. सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 31 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकात 5 बाद 182 धावांपर्यंत मजल मारू शकला.

यानंतर गोलंदाजीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच आपली ताकद दाखवून दिली. अर्शदीपने 2 तर सिराजने एक शिकार करत बांगलादेशची अवस्था 3 बाद 10 धावा अशी करून टाकली. त्यानंतर अक्षर पटेल अन् हार्दिक पांड्याने बांगलादेशची मधली फळी कापत बांगलादेशचा निम्मा संघ 41 धावात गुंडाळला. मात्र, यानंतर मोहम्मदुल्ला अन् शाकिब अल हसनने भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. अखेर बुमराहने शाकिबची शिकार करत ही जोडी फोडली. तसेच, रोहित शर्माने या सामन्यात शिवम दुबेला देखील गोलंदाजी करण्याची संधी दिली. आयपीएलमध्ये गोलंदाजी न करणार्‍या शिवम दुबेने आजच्या सामन्यात आपल्या कर्णधाराला नाराज केले नाही. चेंडू अडकून येणार्‍या खेळपट्टीवर शिवमने 3 षटकात फक्त 13 धावा देत 2 बळी देखील टिपले.

ऋषभ पंतचा धमाका
अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामात पुनरागमन केले अन् दिल्लीसाठी अनेक दमदार खेळी केल्या. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंत कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. बांगलादेश विरूद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्माने देखील त्याला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देत त्याला सरावासाठी जास्त चेंडू कसे मिळतील हे पाहिले. पंतने देखील तुफान फटकेबाजी करत त्याने 32 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. अर्धशतकानंतर पंत रिटायर्ड झाला.
Exit mobile version