स्पर्धेत सलग सहा विजयाचा झंझावात कायम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाने आशिया कप 2025 स्पर्धेत सलग 6 विजय मिळवले आहेत. भारताने साखळीनंतर सुपर 4 फेरीत विजयी झंझावात कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धुळ चारली. भारताने यूएई, ओमान, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघांना 1 वेळा पराभूत केलं. तर भारताने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीत एकूण 2 वेळा पराभूत केले. आता भारतीय संघाने आशिया कप ट्रॉफी जिंकण्यासाठी या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्यांदा दोन हात करणार आहे.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 41 वर्षांत भारतविरुद्ध पाकिस्तान हे 2 संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. या महामुकाबल्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यानिमित्ताने दुबईत सहाव्यांदा आमनेसामने असणार आहेत. या आधी दोन्ही संघात 5 टी 20 सामने झाले आहेत. भारताने या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. भारतीय संघ या टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेआधी पाकिस्तान विरुद्ध टी 20 सामने जिंकण्याबात 2-1 ने पिछाडीवर होती. मात्र, भारतीय संघाने साखळी आणि सुपर 4 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत 3-2 ने आघाडी घेतली.
भारताने 14 सप्टेंबरला साखळी फेरीत 7 विकेट्सने पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. भारतीय संघाने सुपर 4 फेरीत पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने यासह दुबईत 5 सामन्यांनंतर 3-2 ने आघाडी घेतली आहे.
शेवट गोड तर सर्व गोड
रविवारचा सामना सभ्यतेपेक्षा निकालासाठी अधिक लक्षात ठेवला जाईल. शेवट गोड तर सर्व गोड या म्हणीप्रमाणे, भारतासाठी फक्त एकच शेवट स्वीकारार्ह असेल.
पाकिस्तानची नाजूक फलंदाजी
भारत अभिषेकवर जास्त अवलंबून असेल, तर पाकिस्तानची फलंदाजीची कमजोरी अधिक स्पष्ट आहे. त्यांची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. साहिबजादा फरहान वगळता त्यांचा दुसरा कोणताही फलंदाज प्रभावी ठरलेला नाही. सईम अयुबला चार वेळा शून्यावर बाद व्हावे लागले आहे. हुसेन तलत आणि सलमान अली आगा भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे अपयशी ठरले आहेत.






