जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारत दुसरा

| अंताल्या (तुर्की) | वृत्तसंस्था |

तुर्कीमधील अंताल्या शहरात सुरू असणार्‍या तिरंदाजी विश्‍वकरंडक स्टेज वन स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष संघाने रिकर्व्ह प्रकारात दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे. शिवाय बी. धीरजला रिकर्व्ह प्रकारातच एकेरीमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

सुवर्णपदकाच्या सामन्यात चीनने भारताचा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय संघातर्फे या सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये अतानू दास, तरुणदीप राय आणि धीरज बोम्मादेवरा सहभागी झाले होते. या अंतिम सामन्यात भारतीय संघाला चीनकडून 4-5 असे पराभूत व्हावे लागले. या सुवर्णपदकाच्या लाढतीमध्ये भारतीय संघ आधी 0-4 असा मागे पडला होता; मात्र नंतर अतानू दास, तरुणदीप राय आणि धीरज बोम्मादेवरा यांनी जोरदार खेळ करत 4-4 अशी बरोबरी साधली. पहिले दोन सेट चीनच्या संघाने 55-54, 56-50 असे जिंकले; तर 0-4 अशा पिछाडीवरून भारतीय संघाने पुढील दोन सेट 59-58, 56-55 असे जिंकले.

चार सेटनंतर भारताने 4-4 अशी बरोबरी साधली. त्यामुळे या सुवर्णपदकाच्या लढतीचा निर्णय टायब्रेकमध्ये लावला गेला; मात्र टायब्रेकरमध्येसुद्धा 28-28 असा निकाल लागला; परंतु टायब्रेकमध्ये चीनच्या संघाने एक अचूक लक्ष्य भेद केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आणि सुवर्णपदक बहाल करण्यात आले. चीनने या स्पर्धेमध्ये चार वर्षांनी पुनरागमन करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

रिकर्व्ह प्रकाराच्या एकेरीमध्ये धीरज बोम्मादेवरा याने कांस्यपदक जिंकले. धीरजला उपांत्य फेरीच्या सामन्यात मॉल्डोवाच्या डॅन ओलारूकडून 4-6 असे पराभवास सामोरे जावे लागले. तसेच ब्राँझपदकाच्या लढतीमध्ये धीरजने कझाकस्तानच्या इल्फत अब्दुल्लीन याचा 7-3 असा पराभव करत विजय संपादन केला. भारतीय तिरंदाजांनी कंपाऊंड प्रकारात दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण चार पदकांवर मोहोर उमटवली.

Exit mobile version