भारताकडून स्पेन शूटआऊट; 3-1 असा केला पराभव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

क्रिशन बहादूर पाठकच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे प्रो लीग हॉकीच्या परतीच्या लढतीत भारतीय वरिष्ठ संघाने रविवारी शूट-आऊटमध्ये स्पेनचा 3-1 असा पराभव केला. चार सामन्यानंतर भारताने प्रो लीगच्या गुणतक्त्यात 8 गुणांसह आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात भारताला स्पेनकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करताना भारताने परतीच्या लढतीत स्पेनवर मात केली. नियोजित वेळेतील 2-2 अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठकची कामगिरी निर्णायक ठरली.

नियोजित वेळेत भारतासाठी कर्णधार हरमनप्रीतने 12 आणि 32 व्या मिनिटाला मिळालेले पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावले होते. भारताला 2-0 ही आघाडी अखेरच्या टप्प्यात टिकविता आली नाही. स्पेनने अखेरच्या टप्प्यात वेगवान चाली रचताना भारतीय बचावफळीवर दडपण ठेवले. सामन्याच्या 43व्या मिनिटाला स्पेन कर्णधार मार्क मिरालेसने पहिला गोल केला. त्यानंतर 55व्या मिनिटाला पेरे अमाटने स्पेनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट-आऊटमध्ये भारतासाठी हरमनप्रीत, राजकुमार पाल आणि अभिषेक यांनी गोल केले. त्याच वेळी गोलरक्षक पाठकने स्पेनच्या जॅक्वीन मेनिनी, रॅफेल व्हिलालोन्गा आणि मिरालेस यांचे प्रयत्न शिताफीरने परतवून लावत भारताचा विजय निश्‍चित केला.

Exit mobile version