भारताची अंतिम सामन्यात धडक

महिला संघाकडून बांगलादेशल पराभवाचा धक्का; सलग दुसऱ्यांदा पदकासाठी सज्ज

| निशिन | वृत्तसंस्था |

भारतीय महिला क्रिकेट संघाने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पक्के केले आहे. रविवारी (दि.20) झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाला 114 धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता अंतिम सामना हा सुवर्ण आणि रौप्य पदकाचा असणार आहे. दरम्यान, बांगलादेश पराभूत झाले असले तरी त्यांना कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी आहे.

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी (दि.20) झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने बांगलादेशसमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 15.4 षटकातच 81 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून दिलारा अख्तरने सर्वाधिक 27 धावा केल्या. तिच्याशिवाय केवळ शर्मिन अख्तर (10) आणि सुलताना खातुन (12) यांनाच 2 आकडी धावसंख्या पार करता आली. बाकी कोणीही 10 धावांपर्यंतही पोहचू शकले नाही. यावेळी भारताच्या पाचही गोलंदाजांनी बळी घेतले. भारताकडून गोलंदाजी करताना नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर, श्री चरणीनेही 2 बळी घेतले असून, क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पुर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. भारताकडून शफाली वर्माने विस्फोटक फलंदाजी करताना शतक साजरे केले. तिने 49 चेंडूतच 3 चौकार आणि 9 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली. तसेच, स्मृती मानधनाने 37 धावांची, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 40 धावांची खेळी केली. गुनालन कमलिनी (3) आणि रिचा घोष (2) या मात्र स्वस्तात बाद झाल्या. भारती फुलमाली 9 धावांवर नाबाद राहिली. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मारुफा अख्तर, संजिदा अख्तर मेघला, राबेया कान आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणार आहे. 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. आता हेच सुवर्णपदक राखण्यासाठी मंगळवारी (दि.22) भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका महिला संघ 10 दिवसात दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहेत. याआधी दि.13 सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही हे दोन संघ आमने-सामने होते, त्यात भारताने विजय मिळवत आठव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले होते. आता दि.22 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात विजय मिळवणारा संघ सुवर्णपदक जिंकेल, तर पराभूत होणारा संघ रौप्यपदक जिंकेल. त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना पदक मिळणार हे निश्चित आहे.

शफाली वर्माची शतकी खेळी
आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने शफाली वर्माच्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य दिले. या सामन्यात शफालीने 3 चौकार आणि 9 षटकारांच्या साहाय्याने 49 चेंडूंत नाबाद 100 धावा ठोकल्या. तिने हे शतक भारताच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेत केले. तिचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले आहे. तसेच, तिच्या मर्यादित षटकांच्या कारकिर्दीतीलही हे पहिलेच शतक आहे. याआधी तिच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक शतक आहे. त्यामुळे तिने ही शतकी खेळी करत इतिहास रचला असून, ती आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक करणारी पहिलीच फलंदाज ठरली आहे.
स्मृती मानधनाचा ऐतिहासि क पराक्रम
या सामान्यात स्मृती 19 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 37 धावा करत बाद झाली. याबरोबरच तिने दोन मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. स्मृती महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार पूर्ण करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्याचबरोबर ती टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आली आहे. ही कामगिरी करताना तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकले आहे.
Exit mobile version