बुमराहवर उपकर्णधाराची जबाबदारी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताने अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान राखण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेमुळे बुमराहवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बुमराहला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. पण बुमराह न्यूझीलंड मालिकेत उपकर्णधार म्हणून दिसणार आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने इराणी चषकात सरासरी कामगिरी केली होती. पुन्हा एकदा त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. या मालिकेत द्विशतकवीर सरफराज खानलाही संधी देण्यात आली आहे. त्याने इराणी चषकात द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. तसेच, भारतीय संघातील राखीव खेळाडूंमध्ये काही युवा खेळाडूंचे नशीब चमकले आहे. या यादीत हर्षित राणा, वेगवान गोलंदाज मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. नुकतेच नितीश आणि मयंक यांनी भारतीय संघात टी-20मध्ये पदार्पण केले आणि बांगलादेशविरुद्ध त्यांच्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
न्युझीलंडविरुद्ध पहिली कसोटी सामना बंगळुरू येथे 16 ते 20 ऑक्टोबर, दुसरा कसोटी समना पुणे येथे 24 ते 28 ऑक्टोबर तर तिसरा कसोटी सामना मुंबई येथे 1 ते 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीपराखीव.
राखीव खेळाडू- हर्षित राणा, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा.