। काठमांडू । वृत्तसंस्था ।
नेपाळच्या क्रिकेट संघाने अलीकडच्या काळात खूप सुधारणा केली आहे. संघाने नुकताच टी-20 विश्वचषकात भाग घेतला होता. या स्पर्धेत नेपाळने अनेक मोठ्या संघांना आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर आता नेपाळचा संघ दोन आठवड्यांसाठी भारत दौर्यावर येणार आहे. परंतु, नेपाळचा संघ भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी नाही तर एका विशेष कारणासाठी भारतात येणार आहे.
नेपाळचा क्रिकेट संघ दोन आठवडे भारतात राहणार आहे. यादरम्यान संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. नेपाळचा या वर्षातील हा दुसरा भारत दौरा असणार आहे. नेपाळने यापूर्वी टी-20 विश्वचषकच्या तयारीसाठीदेखील भारताला भेट दिली होती. त्यावेळी संघाचे प्रशिक्षण शिबीर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आले होते. तसेच, नेपाळने बडोद्याविरुद्ध काही सराव सामनेही खेळले होते.
यावेळी नेपाळ एनसीए येथे क्रिकेट विश्वचषक लीग 2 मालिकेसाठी सराव करणार असल्याची घोषणा नेपाळ क्रिकेट बोर्डाने केली आहे. नेपाळचा संघ सोमवारी (दि.12) भारताकडे रवाना झाली आहे. बोर्डाने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, नेपाळचा संघ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मालिकेची तयारी करण्यासाठी भारताकडे रवाना झाला आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दोन आठवड्यांचे प्रशिक्षण आमच्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य वाढवण्यास मदत करेल.