राज्यात इंडिया विरुद्ध एनडीए सामना रंगणार

1 सप्टेंबरला दोन्ही आघाड्यांच्या मुंंबईत बैठका

| मुंबई | प्रतिनिधी |

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातही इंडिया विरुद्ध एनडीए असा सामना रंगणार आहे. यानिमित्ताने 1 सप्टेंबरमध्ये दोन्ही आघाड्यांच्या बैठका मुंबईत आयोजित करण्यात आल्याने आरोप, प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत असताना आता एनडीएने देखील त्याच दिवशी मुंबईत बैठक ठेवली आहे. इंडियाची बैठक 1 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक 1 सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी (दि.29) ही माहिती दिली आहे.

प्रागतिक आघाडी इंडियासोबत
शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील 13 छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला 'प्रागतिक विकास मंच' मुंबईत होत असलेल्या 'इंडिया आघाडी'मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी 38 पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे.

Exit mobile version