भारतासाठी विश्‍वचषक जिंकायचाय – तिलक वर्मा

| तारौबा | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या टी-20 लढतीत वेस्ट इंडीजकडून चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या लढतीत एका नव्या दमाच्या खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. आपल्या कारकीर्दीतील पहिलाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या तिलक वर्मा याने भारताकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी साकारली. याच पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयकडून त्याच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडिओ जारी केला. तिलक वर्मा याप्रसंगी म्हणाला, “भारतासाठी विश्‍वकरंडक जिंकायचा आहे.

“अगदी लहानपणापासून भारताला विश्‍वकरंडक जिंकून देण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. मी अमुक स्थानावर फलंदाजीला येईन आणि भारताला विश्‍वकरंडक जिंकून देईन, अशी कल्पना माझ्या डोळ्यांसमोर दररोज येते. आता मला भारतीय संघाची जर्सी मिळाली आहे. त्यामुळे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे, ’’ असे तिलक म्हणाला. “भारतासाठी खेळण्याचे स्वप्न मीही बघितले होते, पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते,’’ असेही तो म्हणाला.

कर्णधार हार्दिककडूनही कौतुक
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही तिलक वर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात षटकार मारून करणे ही सोपी बाब नव्हे. तिलककडे कमालीचा आत्मविश्‍वास आहे. तो निडर आहे. भारतासाठी तो संस्मरणीय कामगिरी करू शकतो.’’

Exit mobile version