भारत भूषवणार ऑलिंपिकचे यजमानपद?

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारत 2036 मधील ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी तयार झाला आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये तीनदिवसीय सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतात तब्बल 40 वर्षांनंतर आयओसी सत्र पार पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सत्राचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी ते म्हणाले, ऑलिंपिक या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याचे स्वप्न 140 कोटी भारतीयांनी बघितले आहे. या सर्वांच्या मनातील भावना मी आपणासमोर सादर करीत आहे. तुमच्या साथीने आम्हा भारतीयांचे स्वप्न साकार होणार आहे. भारत फक्त क्रीडाप्रेमी देश नसून आम्ही खेळ जगतो, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, खेळ हा सर्वांसाठी आहे. खेळ केवळ विजेता निर्माण करत नाही, तर शांतता वाढवतो. खेळ हा जगाला जोडण्याचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे बोधवाक्य वेगवान, उच्च, एकत्र, मजबूत हे खेळाला समर्पक आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 107 पदकांवर मोहोर उमटवलेल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचेही कौतुक केले. दरम्यान, भारताने 2029मध्ये होणार असलेल्या युथ ऑलिंपिकच्या यजमानपदाचीही तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सत्राच्या उद्घाटनप्रसंगी भारतातील दिग्गजांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्या नीता अंबानी यांच्या पुढाकाराने मुंबईत या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्री यांनीही येथे हजेरी लावली होती.

Exit mobile version