पुढच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारत मोठी झेप घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।

भारतीय खेळाडूंनी चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 ब्राँझ अशी एकूण 107 पदकांची कमाई करीत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

2026मध्ये जपान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यंदाच्या स्पर्धेपेक्षा अधिक पदके भारतीय खेळाडू पटकावतील, असा विश्वास नरेंद्र मोदी यांच्याकडून याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. भारतामध्ये गुणवत्तेची कमी नाही. याआधीही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत होते; पण त्यांना बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत असे. 2014नंतर मात्र परिस्थिती बदलली. भारतीय खेळाडूंना अव्वल दर्जाच्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या. त्यांच्या सरावाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. परदेशात सरावासाठी पाठवण्यात आले.आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये ठसा उमटवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा, असा सल्लाही पंतप्रधानांनी खेळाडूंना दिला आहे.

भारतातील महिला खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कात टाकली. भारताने जिंकलेल्या पदकांपैकी अर्धी पदके महिलांनी जिंकली आहेत. महिलांनी भारतातील नारीशक्तीची प्रचिती दिली. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात भारतीय महिला सुवर्णपदक जिंकण्यासाठीच मैदानात उतरल्या आहेत, असे वाटत होते. असे मोदी म्हणाले.

Exit mobile version