बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

सात्विक आणि चिराग यांची ऐतिहासिक कामगिरी

। मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सात्विक आणि चिराग यांनी तब्बल 58 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. इतकंच नाही बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे पुरुष दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सात्विक आणि चिराग यांनी इतिहास रचला आहे.

सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी:
बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतील पुरुष दुहेरीसाठी अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम फेरीत सात्विक आणि चिराग जोडीनं मलेशियाच्या आंग ये आणि सिन-तोई यी यांच्यावर 16-21, 21-17, 21-19 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिरागनं पुनरागमन करत सलग गेममध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

1971 मध्ये, दिपू घोष-रमन घोष या भारतीय जोडीने शेवटचं आशियाई चॅम्पियनशिप दुहेरीत कांस्यपदक जिंकलं होतं. या खेळीनंतर भारतीय जोडीने दुहेरीत पुन्हा पदक जिंकलं होतं. त्यानंतर आता तब्बल 58 वर्षानंतर सात्विक आणि चिरागने ही शानदार ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक आणि चिरागचं कौतुक केलं आहे. ”सात्विक आणि चिराग आम्हाला तुमचा अभिमान आहे. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

दरम्यान, भारतीय बॅडमिंटन संघाने सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना 20 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

Exit mobile version