महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता

अंतिम फेरीत चिनी तैपेईला हरवले

| ढाका | वृत्तसंस्था |

भारतीय महिला संघाने सलग दुसरा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपेईचा 35-28 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छत्तीसगडच्या रेडर संजू देवीला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आले. ढाका येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघ सुरुवातीपासूनच पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसला. भारताने 2012 मध्ये इराणचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. विशेष म्हणजे, संघाने 2012 आणि 2025 या दोन्ही विश्वचषक हंगामात आपले सर्व 12 सामने जिंकले आहेत.

ढाका येथील शहीद सुहारावर्दी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात टॉस चायनीज तैपेईने जिंकला आणि भारताला पहिल्या रेडची संधी मिळाली. संजू देवीने सुरुवातीच्या रेडमध्येच संघाला आघाडी मिळवून दिली. तैपेईने बोनस घेऊन प्रत्युत्तर दिले, पण पूनम आणि सोनालीच्या टॅकल्समुळे भारताची पकड आणखी मजबूत झाली.संजूने सुरुवातीच्या मिनिटांतच तीन गुणांची आणखी एक दमदार रेड केली. तैपेईच्या येन चियाओ-वेनने दोन गुण घेऊन स्कोअर 7-7 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सुपर टॅकलमुळे तैपेई 9-7 ने पुढेही गेली.

12व्या मिनिटात संजूने चार खेळाडूंना बाद करून सामन्याचे चित्र बदलले आणि भारताने 13-12 अशी आघाडी घेतली. तैपेईच्या ह्वांग सु-चिनने फरक कमी ठेवण्याचा प्रयत्न केला, पण संजूच्या दोन गुणांच्या रेडने आणि त्यानंतरच्या ऑल आऊटने भारताला 17-14 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत भारत 20-16 ने पुढे होता. दुसऱ्या हाफची सुरुवात तैपेईने बोनस पॉइंटने केली, पण पुष्पाच्या तीन गुणांच्या रेडने भारताची आघाडी पुन्हा वाढवली. तैपेईने रेड आणि टॅकलने पुनरागमनाचा प्रयत्न केला आणि स्कोअर 25-22 पर्यंत आणला, पण भारताच्या संतुलित रेडिंग आणि मजबूत डिफेन्सने त्यांना पुढे जाऊ दिले नाही.शेवटच्या चार मिनिटांत तैपेईपेने सुपर टॅकल करून फरक 30-26 पर्यंत नक्कीच कमी केला, पण भारताने पुन्हा सामन्यावर पकड मजबूत करत आणखी एकदा ऑलआउट केले. निर्धारित वेळेनंतर भारत 35-28 ने विजयी ठरला.

चीनी तैपेईविरुद्ध भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाने 26-25 ने विजय मिळवला होता. त्याच स्पर्धेतील गट सामन्यात दोन्ही संघ 34-34 ने बरोबरीत राहिले होते.भारतीय संघाने गट फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत आपले सर्व सामने दमदार पद्धतीने जिंकले. 18 नोव्हेंबर रोजी भारताने थायलंडला 65-20 ने हरवून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी बांगलादेशला 43-18 ने, 20 नोव्हेंबर रोजी जर्मनीला 63-22 ने आणि 21 नोव्हेंबर रोजी युगांडाला 51-16 ने पराभूत केले. उपांत्य फेरीत भारताने इराणला 33-21ने हरवले आणि अंतिम फेरीत चीनी तैपेईवर 35-28 च्या विजयासह सलग दुसरे विश्वचषक विजेतेपद पटकावले.

Exit mobile version