भारताने मालिका जिंकली

अखेरच्या सामान्यात पराभव; वेस्ट इंडिजचा पाच विकेट्सने विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा वेस्ट इंडिजने यशस्वी पाठलाग केला. कर्णधार शे होपने नाबाद 162 धावांची मॅचविनिंग खेळी करत भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. शुभमन गिल (1) आणि विराट कोहली (0) झटपट बाद झाल्याने भारताची अवस्था 4 बाद 2 अशी झाली होती. त्यानंतर रोहित शर्माने 85 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 92 धावांची खेळी करत डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने 57 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर के.एल. राहुलने आक्रमक फलंदाजी करत 87 चेंडूंत नाबाद 129 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. नमन धीरने 30 धावांचे योगदान दिल्याने भारताने 50 षटकांत 7 बाद 351 धावा उभारल्या.

विजयासाठी 352 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवातही खराब झाली. जॉन कॅम्पबेलला मोहम्मद सिराजने अवघ्या 10 धावांवर बाद केले. मात्र, त्यानंतर शे होपने अमिर जांगूसोबत दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. जांगूने 67 धावा केल्या. जांगू बाद झाल्यानंतरही शे होपने एक बाजू लावून धरली. त्याने 143 चेंडूंत 17 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 162 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. कीमो पॉलने 44 धावांची आक्रमक खेळी केली. भारताच्या गोलंदाजांना 351 धावांचा बचाव करण्यात अपयश आले. या सामन्यात अंशुल कंबोजने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला विशेष प्रभाव पाडता आला नाही. संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरली नाही. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापनाला गोलंदाजीच्या बाबतीत अधिक काम करावे लागणार आहे.

Exit mobile version