भारतीय क्रिकेटपटूंना पैशाचा घमंड

कपिल देव यांचा घणाघात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आताच्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना पैशाचा घमंड आहे, असा घणाघात 1983 च्या विश्वचषकाचे विजेते कर्णधार कपिल देव यांनी केला आहे. नुकत्याच एका वृत्तपत्रा दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, कधी कधी जास्त पैसा असल्यानेही गर्व होतो. सध्याचे खेळाडू पैशाच्या अहंकाराने माजी खेळाडूंकडे सल्ल्यासाठी जात नाहीत आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करतात. खेळात सुधारणेला नेहमीच जागा असते.

कपिल देव पुढे म्हणाले की, क्रिकेटर्सना वाटते की त्यांना सर्व काही माहीत आहे. पूर्वीच्या आणि आजच्या क्रिकेटपटूंमध्ये हाच फरक आहे. मी म्हणेन की, असे बरेच क्रिकेटपटू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. सुनील गावस्कर असताना तुम्ही त्यांच्याशी का बोलू शकत नाही? त्यांना वाटते की, आपल्याला सर्व काही माहीत आहे. त्यांना कदाचित सर्व माहीत असेल; परंतु ज्याने क्रिकेटचे 50 सीझन पाहिले आहेत, त्यांच्याकडून अतिरिक्त मदतीने काही नुकसान होणार नाही.

Exit mobile version