फिफा क्रमवारी,कतारची 37 व्या स्थानावर मुसंडी
| नवी दिल्ली | वृत्तसेवा |
भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत 117 व्या स्थानावर घसरण झाली आहे. एएफसी आशियाई फुटबॉल करंडकात सुमार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ 102 व्या स्थानावरून 15 स्थानांनी खाली घसरला आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई करंडकासाठी पात्र ठरला होता, पण साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये त्यांना निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.
ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान व सीरिया या तीनही देशांविरुद्ध भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. याआधी इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाची 2021 मध्ये 107 व्या स्थानावर घसरण झाली होती. त्यानंतर तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय संघाची घसरण झाली आहे.
कतार संघाने या वर्षी एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. हे त्यांचे या स्पर्धेचे दुसरे जेतेपद ठरले. या जेतेपदामुळे कतार संघाने फिफा क्रमवारीत 21 स्थानांनी प्रगती केली आहे. आता कतारचा संघ 37 व्या स्थानावर पोहोचला आहे. तझिकिस्तानच्या संघाने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. याचा फायदा त्यांना क्रमवारीत झाला आहे. सात स्थानांनी प्रगती करीत त्यांचा संघ 99 व्या स्थानावर पोहोचला आहे.
आयव्हरी कोस्ट संघाने या वर्षी आफ्रिकन फुटबॉल करंडक पटकावला. त्यामुळे आयव्हरी कोस्ट संघाला 10 स्थानांनी प्रगती करीत 39 व्या स्थानावर पोहोचता आले आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या नायजेरिया संघानेही 28 व्या स्थानावर झेप घेतली आहे. विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ पहिल्या स्थानावर कायम असून पहिल्या दहा संघांच्या क्रमवारीत बदल झालेला नाही.