ऑस्ट्रेलियाकडून 4-2ने मात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसर्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या लढतीत 5-1 असा दणदणीत विजय मिळवणार्या यजमान ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी भारतीय संघावर 4-2 असा विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. तिसर्या क्वॉर्टरमध्ये बचावात केलेल्या सुमार कामगिरीचा फटका भारतीय हॉकीपटूंना बसला. दोन देशांमधील तिसरा सामना येत्या 10 एप्रिलला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हायवर्ड (सहावे मिनिट, 34वे मिनिट), जेकब अँडरसन (42वे मिनिट) व नॅथन एफरॉम्स (45वे मिनिट) यांनी शानदार गोल करताना विजयाचा मोलाचा वाटा उचलला. जेरेमी याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. जेकब व नॅथन यांनी फिल्ड गोल केले. भारताकडून जुगराज सिंग (नववे मिनिट) व कर्णधार हरमनप्रीत सिंग (30वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना कडवी झुंज दिली.
पूर्वार्धात 2-1 आघाडी सहाव्या मिनिटाला जेरेमी हायवर्ड याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी बचावात छान कामगिरी केली. नवव्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसर्या क्वॉर्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला आणि आघाडी मिळवून दिली. हा त्याच्या कारकिर्दीतील 180वा गोल ठरला. भारतीय संघाकडे पूर्वार्धात 2-1 अशी आघाडी होती.
आक्रमणासमोर बचाव निष्प्रभ यजमान ऑस्ट्रेलियन संघ पूर्वार्धात पिछाडीवर असल्यामुळे तिसर्या क्वॉर्टरमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका पत्करली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आक्रमणापुढे भारतीय खेळाडूंचा बचाव निष्प्रभ ठरला. ऑस्ट्रेलियन हॉकीपटूंनी 34 ते 45 अशा बारा मिनिटांमध्ये तीन गोल करताना उल्लेखनीय कामगिरी केली. जेरेमी, जेकब व नॅथन यांनी यादरम्यान गोल करीत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली; पण ऑस्ट्रेलियाचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.