सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शानदार विजयांची नोंद करीत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
महिला एकेरीत अग्रमानांकित आणि माजी विश्वविजेत्या सिंधूने 36 मिनिटांत 21 वर्षीय अश्मिताला 21-7, 21-18 असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हैदराबादच्या 26 वर्षीय सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कॅटरथाँगशी सामना होणार आहे. सिंगापूरच्या तिसर्या मानांकित येओ मिनने आजारपणामुळे माघार घेतल्याने सुपानिडाला पुढे चाल मिळाली. याआधी 2019च्या राष्ट्रीय स्पर्धेत सिंधूने आसामच्या अश्मिताला नामोहरम केले होते.
आकर्षी कश्यपने मालविका बनसोडची झंझावाती वाटचाल 21-12, 21-15 अशी रोखली. तिची उपांत्य फेरीत थायलंडच्या द्वितीय मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत एक तास चाललेल्या उपांत्यपूर्व लढतीत तिसर्या मानांकित लक्ष्यने आठव्या मानांकित एचएस प्रणॉयवर 14-21, 21-9, 21-14 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. लक्ष्यचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी झे यंगशी सामना होईल.