| धरमशाला | वृत्तसंस्था |
विश्वचषकामध्ये भारताने आपले सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आता त्यांचा सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या न्यूझीलंड विरूद्ध आहे. रविवारी भारत पाचवा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी उत्सुक असणार आहे.दरम्यान, टीम इंडियातील स्टार खेळाडूंना बीसीसीआय एक खूशखबरी दिली आहे. भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंना विश्वचषकादरम्यानच विश्रांती मिळणार आहे. न्यूझीलंडविरूद्धचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ एक छोटी विश्रांती घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहेत.
न्यूझीलंडचा सामना झाल्यानंतर भारतीय संघ थेट 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध सामना खेळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये सात दिवस आहेत. यावेळी खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विश्वचषकाच्याथकवणाऱ्यावेळापत्रकामध्ये हा छोटी सुट्टी खेळाडूंना ताजेतवाने करेल.श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये 30 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया चषक आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू खेळले होते.
बीसीसीआयच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘खेळाडूंना दोन ते तीन दिवस ऐच्छिक विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरून ते आपल्या घरी जाऊ शकतील. हि विश्रांती न्यूझीलंड सामन्यानंतर देण्यात येणार आहे. दोन सामन्यांमध्ये सात दिवसांचे अंतर असल्याने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू लखनौमध्ये 26 ऑक्टोबरला एकत्र जमतील. भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंचा प्रवास आणि कामाचे स्वरूप पाहून सराव सत्राचे नियोजन केले आहे.







