संघ एक, कर्णधार तीन
सूर्या टी-20, राहुल एकदिवसीय आणि रोहित कसोटी संघाची धुरा सांभाळणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दहा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची तिन्ही प्रकारासाठी गुरुवारी निवड समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात आली. प्रत्येक प्रकारात वेगळा कर्णधार संघाचे नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादव टी-20, के.एल. राहुल एकदिवसीय आणि रोहित शर्मा कसोटीत कर्णधार असेल. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित आणि विराट कोहलीला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
द.आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे तर टी-20चे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. मोहम्मद शमीवर सध्या उपचार सुरू असून, तो तंदुरुस्त असेल, तर त्याची निवड केली जाईल, असे निवड समितीने स्पष्ट केले. आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. दौऱ्याची अखेर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिली कसोटी 26 डिसेंबरला सेंच्युरियन येथे, तर दुसरी कसोटी नव्या वर्षी म्हणजे 3 जानेवारी 2024 पासून केपटाऊन येथे खेळवली जाईल.
एकदिवसीय संघात संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. तर दुखापतीतून बाहेर आलेल्या रजत पाटीदारलादेखील संघात स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. तो सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 संघात कुलदीप यादवला स्थान देण्यात आले आहे.
दोन सामन्यांच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना स्थान मिळू शकले नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे कसोटी संघात आहेत.
टी-20 संघ
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, जितेश शर्मा, रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
एकदिवसीय संघ
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, केएल राहुल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी (फिटनेसवर अवलंबून) जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.