खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची अधिक चर्चा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
येत्या काही दिवसांवर आलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेची अंतिम तयारी सुरू झाली आहे. भारतीय टेबल टेनिस संघ जर्मनीच्या सारब्रुकेन या शहरात सराव करत आहे; पण खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफची असलेली अधिक संख्या चर्चेचा विषय ठरत आहे.
इटलीचे मॅसिमो कोस्टँटिनी तिसर्यांदा भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असणार आहेत आणि त्यांच्या मदतीला भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक सौरव चक्रवर्ती आहेत. इतकेच नव्हे तर चार खेळाडूंसाठी त्यांच्या चार खासगी प्रशिक्षकांना क्रीडा खात्याने मंजुरी दिली आहे. दोन मसाजर आणि एक फिजिओ असा नऊ सदस्यांचा सपोर्ट स्टाफ असणार आहे आणि खेळाडू पुरुष आणि महिला प्रत्येकी तीन असे सहा जण आहेत.
स्टार खेळाडू मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत हे खासगी प्रशिक्षकांसह पॅरिसमध्ये जाणार आहेत. या ऑलिंपिकमध्ये भारताचा ध्वजधारक असणारा अनुभवी खेळाडू शरथ कमाल याच्या साथीला ख्रिस फायफर हे त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक असणार आहेत. हरमी देसाई आणि मानव ठक्कर हे पुरुष संघातील इतर दोन खेळाडू आहेत. संघात अनेक प्रशिक्षक, मार्गदर्शक असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कल्पना मांडू शकतात, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो, असे बोलले जात आहे; पण मॅसिमो कोस्टँटिनी हे संघासोबत एक महिन्यापेक्षा अधिक काळ असल्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी रणनीती तयार केली असेल आणि प्रत्यक्ष स्पर्धेत अडचण येणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे.
वैयक्तिक प्रशिक्षक संघाचा तांत्रिक भाग
वैयक्तिक प्रशिक्षक हे संघाचा तांत्रिक भाग असतील. ते त्यांच्या कल्पना मांडू शकतात. मीसुद्धा माझे मत व्यक्त करणार; पण अंतिम निर्णय माझाच असेल, असे मॅसिमो कोस्टँटिनी यांनी सांगितले. स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी कोर्टवर संघाचे मुख्य प्रशिक्षकच उपस्थित राहू शकतात. वैयक्तिक प्रशिक्षक प्रेक्षक स्टँडमध्येच उपस्थित राहू शकतील. इतकेच नव्हे तर खेळाडू राहत असलेल्या क्रीडाग्राममध्येही त्यांचा निवास नसेल.