अपोलो टायर्स सोबत करार
| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
देशात ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल 2025 लागू करण्यात आल्यामुळे बीसीसीआयने ड्रीम 11 बरोबरचा करारही संपुष्टात आणला होता. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत प्रायोजकाशिवाय खेळताना दिसत आहे. त्याचवेळी बीसीसीआयने नव्या प्रायोजकाचा शोध सुरू केला होता आणि त्यांच्या हाती मोठे डिल लागले आहे. आता अपोलो टायर्स हा भारताचा नवा जर्सी प्रायोजक असणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे अपोलो टायर्ससोबतच्या कराराची पुष्टी केली असून हा करार अडीच वर्षांसाठी असणार आहे. त्यांनी एका सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये मोजण्याची तयारी केली आहे. यापूर्वी ड्रीम 11 एका सामन्यासाठी 4 कोटी रुपये मोजत होते.
भारतीय संघाच्या जर्सीवर पूर्वी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम11 चे नाव होते. परंतु; भारत सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगबाबत एक नवीन कायदा बनवला आहे, ज्यामुळे ऑनलाइन मनी गेम चालवणे आणि त्यांचा प्रचार करणे दंडनीय ठरणार आहे. त्यासोबतच, असे करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगावी लागू शकते. या कारणास्तव, बीसीसीआयने ड्रीम 11 सोबतचा करार पूर्ण करण्यापूर्वीच हा करार अर्ध्यावरच संपवला आहे. सध्या भारतीय संघ आशिया चषकात प्रायोजकाशिवाय खेळत आहे. आता बीसीसीआयने जर्सीसाठी नवीन प्रायोजक शोधला आहे. त्यामुळे अपोलो टायर्स हा भारताचा नवा जर्सी प्रायोजक असणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाच्या जर्सी प्रायोजकाच्या शर्यतीत कॅन्वा व जेके टायर्स या दोन कंपन्याही होत्या. त्याशिवाय बिर्ला ऑप्टसनेही इच्छा व्यक्त केली होती. बीसीसीआयने 2 सप्टेंबरला त्यासाठी अर्ज मागवले होते. परंतु, त्यांनी बिडिंग प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्रायोजकत्वासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबरपर्यंत ठेवली होती आणि बोर्डाने मंगळवारी अपोलो टायर्सचे नाव अंतिम केले आहे. तसेच, या प्रक्रियेत बीसीसीआयने गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो व तंबाखूच्या ब्रँड्सनी सहभाग घेऊ नये, हे स्पष्ट केले होते.
अडीच वर्षांचा करार
बीसीसीआय आणि अपोलो टायर्समधील यांच्यातील हा करार अडीच वर्षांसाठी आहे. मार्च 2028 पर्यंत भारतीय संघाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव राहणार आहे. या कालावधीत भारतीय संघाचे जवळपास 130 सामने होणार आहेत. त्यांनी एका सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये मोजण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हा करार अंदाजे 579 रुपये कोटींना झाला असल्याचे समोर येत आहे.
प्रायोजकासाठीचे सर्व विक्रम मोडीत
अपोलो टायर्स व्यतिरिक्त, कॅनव्हा आणि जेके सिमेंट्सनेही आशिया कपच्या लिलावात भाग घेतला होता. यावेळी जेके सिमेंट्सने 477 कोटींची बोली लावली. तर, कॅनव्हाने 544 कोटींची बोली लावली. मात्र, बीसीसीआयचा अपोलो टायर्ससोबतचा करार 579 कोटींना अंतिम झाला. यापूर्वी, बीसीसीआय आणि ड्रीम 11 ने 358 कोटींचा तीन वर्षांचा करार केला होता. त्यामुळे अपोलो टायर्सने सर्व विक्रम मोडले असून भारतीय संघाला जर्सी प्रायोजकासाठीची ही सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.







