| सेंच्युरियन | वृत्तसंस्था |
तो आला, त्याने पाहिलं अन् शतक ठोकलं असच के.एल. राहुलचे वर्णन करता येईल. सेंच्युरियनमध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावत लोकेश राहुलने एक नवा इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मधल्या फळीत फलंदाजी करत एक यष्टीरक्षक म्हणून शतक झळकावणारा धोनी, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनंतरचा दूसरा खेळाडू बनला आहे. 2014, 2021-20 आणि आता 2023-24 बॉक्सिंग डे कसोटीत शतक कारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. के.एल. राहुलने 133 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि चार षटकार मारले आहेत. राहुलने जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले.
वास्तविक, भारताने गुरुवारी आठ गाडी बाद झाल्यानंतर 208 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सिराजने काही चांगले फटाके मारले, मात्र 66व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराज 22चेंडूत पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने नऊ फलंदाज गमावले होते आणि प्रसिध कृष्णा फलंदाजीला आला होता. कोएत्झीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रसिध्दने धाव घेतली. राहुलने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फटकावता आला नाही. राहुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. सेंच्युरियनमधील राहुलचे हे सलग दुसरे कसोटी शतक आहे. 2021मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत राहुलने 248 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली होती. दक्षिण आफ्रिकेतील राहुलचे हे दुसरे कसोटी शतक ठरले.
मोहम्मद सिराज 22 चेंडूत 5 धावांवर खेळात असताना गेराल्ड कोएत्झीने त्याला तंबूत पाठवले . त्याचवेळी नांद्रे बर्जरने राहुलला त्रिफळाचित करीत भारताचा डाव संपवला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच फलंदाज बाद केले . नांद्रे बर्जरने तीन , मार्को जॅनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून निघून गेला आणि शुबमन गिल दोन धावा करून निघून गेला. 24 धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली. विराट 38 धावा करून बाद झाला तर श्रेयस 31 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने 24 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून तंबूत परतला. मात्र, लोकेश राहुल एका बाजूला तंबू ठोकून उभा राहिला. त्याने शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.







