महिला टी-20 विश्वचषक सराव सामना
। दुबई । वृत्तसंस्था ।
युएईमध्ये सुरू होणार्या महिला टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय सामन्यांना 4 ऑक्टोंबरपासून सुरूवात होणार आहे. याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. भारतीय महिला संघानेही रविवार दि.29 सप्टेंबर रोजी पहिला सराव सामना खेळला. ज्यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शेफाली वर्मा 7 धावा तर स्मृती मानधना 14 धावा करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही केवळ 1 धावा करून बाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांनी डाव सांभाळला. रॉड्रिग्जने 40 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यास्तिका भाटियाने 25 चेंडूत 24 धावा केल्या. त्यामुळे संघाला 141 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ 13 धावांत 3 गडी गमावले. यानंतर शिनेल हेन्रीने मधल्या फळीत डावाची धुरा सांभाळली. हेन्रीने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावांची खेळी केली. मात्र, तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. एफी फ्लेचरने खालच्या क्रमाने 21 धावा केल्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याच कारणामुळे वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून पूजा वस्त्राकरने 4 षटकात 1 मेडनसह 20 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मानेही 3 षटकांत 11 धावा देत 2 बळी घेतले.