कबड्डी विश्वचषकात इराणवर चुरशीच्या लढतीत विजय
| पुणे | प्रतिनिधी |
निर्णायक क्षणी संजू देवीने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी इराणवर 33-21 अशी मात करून सलग दुसऱ्यांदा महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी भारताची गाठ चायनीज तैपेइशी पडणार आहे. तैपेइने दुसऱ्या उपांत्य लढतीत बंगलादेशचा 25-18 असा पराभव केला.
ढाका येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी लढतीत भारतीय महिलांचा कस लागला नव्हता. त्यामुळे इराणविरुद्ध भारतीय खेळाडू कसा खेळ करतात याकडे चाहत्यांचे लक्ष होते. मैदानाबाहेर प्रशिक्षक तेजस्विनी यांनी मोठी आघाडी मिळविण्याचे नियोजन केले होते. भारतीय महिला खेळाडूंनी सुरुवातीला आघाडी कायम राखली आणि निर्णायक क्षणी खेळ उंचावत आघाडीतील फरक मोठा केला.सोनाली शिंगटे, पुष्पा आणि कमालीच्या लयीत असलेल्या संजूच्या पकडी करत इराणच्या बचाव फळीने भारतीय संघासमोर आव्हान उभे केले होते. त्यामुळेच मध्यंतराला भारताला केवळ 15-11 अशी चारच गुणांची आघाडी मिळवता आली.
उत्तरार्धात भारतीय महिलांनी सर्व प्रथम इराणवर लोण चढवत आघाडी 27-17 अशी भक्कम केली. या वेळी संजूची चढाई निर्णायक ठरली. एका अव्वल पकडीसह तीन वेळा बाद झालेल्या संजूने या वेळी तीन बचावपटूंचे प्रयत्न शिताफीने परतवून लावत इराणचे दोन गडी टिपले आणि त्यानंतर भारतीय बचाव फळीने इराणच्या खेळाडूची पकड करत लोण पूर्ण केला. त्यानंतर सोनाली शिंगटेने बोनसह एक बळी मिळवत दोन गुणांची कमाई केली. संजूने पुन्हा एकदा आपल्या चढाईत दोन गुण मिळवत भारताची आघाडी कायम राखली. अखेरच्या मिनिटात संजूने एक पकडही केली. संजूने 7 चढाईत 7 गुण, तर सोनालीने 9 चढाईत 4 गुणांची कमाई करून विजयात मोलाची भूमिका बजावली. निर्णायक क्षणी साक्षी आणि रितू नेगीने आपला बचाव भक्कम ठेवला.
इराण संघाची ताकद ओळखून होते. त्यामुळेच आघाडी जेवढी मोठी राहील तेवढी बाजू सुरक्षित राहणार, हे ठाऊक होते. आमच्या खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला आणि अखेरपर्यंत संयम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तेजस्विनी, भारताच्या प्रशिक्षक







