नोदंवला आणखी एक विश्वविक्रम
| चेन्नई | वृत्तसंस्था |
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यादरम्यान उभय देशांचे महिला संघ चेन्नईत कसोटी क्रिकेट खेळत आहेत. भारतीय महिला संघाने या कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून विश्व विक्रम नोंदवला आहे. शफाली वर्माचे द्विशतक अन् स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी भारताने 525 धावा कुटल्या होत्या आणि या कोणत्याही संघाकडून एकाच दिवशी झालेल्या सर्वाधिक धावा होत्या. त्यात दुसऱ्या दिवशी भारताने 6 बाद 603 धावांवर डाव घोषित केला आणि आणखी एक विश्वविक्रम नावावर नोंदवला गेला.
या सामन्यात शफाली वर्माने 197 चेंडूंत 23 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 205 धावा केल्या, तर स्मृतीने 161 चेंडूंत 27 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 149 धावा केल्या. या दोघिंनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 292 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (55), कर्णधार हरमनप्रीत कौर (69) आणि रिचा घोष (86) यांनी अर्धशतक झळकावताना भारताला 6 बाद 603 धावांपर्यंत पोहोचवले. महिला क्रिकेटमध्ये प्रथमच एखाद्या संघाने 600 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याचवर्षी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 बाद 575 धावा करून 1998 सालचा स्वतःचाच (6 बाज 569 वि. इंग्लंड) विक्रम मोडला होता. शनिवारी भारतीय महिला संघाने यात बाजी मारली. महिलांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंड अ संघाविरुद्ध 596 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने 72 षटकांत 4 बाद 236 धावा केल्या आहेत. यात लॉरा वोल्वार्ड (20), अनेके बॉश (39), डेल्मी टकर (0) सुन ल्यूस (65) तसेच, मारिझापे कॅप (67) आणि नादिन डी क्लर्क (27) यांची दुसऱ्या दिवसाअखेर नाबाद खेळी सुरू होती. भारताच्या स्नेह राणाने 3 बळी तर दिप्ती शर्माने एक बळी घेतला.