ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका जिंकली
| मुंबई । वृत्तसंस्था ।
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 190 धावांनी जिंकला. यासह कांगारू संघाने भारताचा धुव्वा उडवत मालिका 0-3 अशी जिंकली. भारत दौर्यावर ऑस्ट्रेलियाला एकमेव कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाने एकदिवसीय मालिका 0-3 अशी जिंकून दमदार पुनरागमन केले आहे. आता दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या लाजिरवाण्या पराभवामुळे भारतीय महिला संघावर सोशल मिडियात जोरदार टीका होत आहे.
भारतीय महिला संघाला गेल्या 16 वर्षात भारतीय भूमीवर एकही एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकता आला नाही. एकदिवसीय मालिकेतील हा भारतीय संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. 1984, 2012, 2018 आणि आता 2023-24 सलग मालिका पराभव भारतीय महिला संघाच्या पदरी आले आहेत. त्यावर आता सोशल मीडियात चाहते चोकर्स असे भारतीय महिला संघाला ट्रोल करत आहेत. काही चाहत्यांनी तर संताप व्यक्त करत आपल्या भावना ट्वीटच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 339 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 148 धावांवर गारद झाला आणि सामना 190 धावांनी गमावला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने 119 धावा केल्या. त्याचवेळी स्मृती मानधनाने भारताकडून सर्वाधिक 29 धावा केल्या.
339 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही गडी न गमावता 27 धावा होती. यानंतर यस्तिका भाटिया 14 चेंडूत 6 धावा करून बाद झाली. मेगन शुटने तिला त्रिफळाचित केले. शूटनेही मानधनाला बाद केले. मानधनाने 29 चेंडूत 29 धावा केल्या. कर्णधार हरपनप्रीतही 10 चेंडूत तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. रिचा घोषने 29 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्ज 27 चेंडूत 25 धावा करून बाद झाली. त्याचवेळी अमनजोत कौर 8 चेंडूत केवळ 3 धावा करून तंबूमध्ये परतली. पूजा वस्त्राकरने 14 धावा केल्या. श्रेयंका पाटील 10 चेंडूत 2 धावा करून बाद झाली. रेणुका ठाकूरला खातेही उघडता आले नाही. मन्नत कश्यप 8 धावा करून बाद झाली. शेवटी दीप्ती शर्मा 25 धावा करून नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेरहॅमने सर्वाधिक तीन महिला फलंदाजांना बाद केले. मेगन शुटे, अॅलाना किंग आणि अॅनाबेल सदरलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅशले गार्डनरला एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज फोबी लिचफिल्ड आणि अॅलिसा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 189 धावांची भागीदारी केली. कर्णधार अॅलिसा हिलीचे शतक हुकले. 85 चेंडूत 82 धावा करून ती बाद झाली. हीलीने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. 29व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने तिला त्रिफळाचित केले. यानंतर आलेली अॅलिस पेरीही काही खास करू शकली नाही आणि 9 चेंडूत 16 धावा करून ती अमजोत कौरची बळी ठरली. ताहलिया मॅकग्रा (0 धावा) आणि बेथ मुनी (3 धावा) यांना एकाच षटकात बाद करून श्रेयंका पाटीलने भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
लिचफिल्ड शतक झळकावून बाद झाली. दीप्तीने तिला बाद केले . तिने 125 चेंडूत 119 धावा केल्या. अॅनाबेल सदरलँड 23 धावा करून बाद झाली आणि अॅशले गार्डनर 30 धावा करून बाद झाली . अखेरीस, अॅलेना किंगने 14 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 338 धावांपर्यंत नेली. भारतीय संघाकडून श्रेयंका पाटीलने तीन आणि अमनजोत कौरने दोन गडी बाद केले . पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.