कांगारूंवर मिळवला ऐतिहासीक विजय
| चंदिगढ | वृत्तसस्था |
भारताच्या महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने कांगारुंचा तब्बल 102 धावांनी धुव्वा उडवला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचे आव्हान ठेवलं होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंना पूर्ण 50 ओव्हरही टिकता आले नाही. त्यांना 40.5 षटकांमध्ये 190 धावांवर गुंडाळले. कांगारुंना रोखण्यात क्रांती गौड हीने निर्णायक भूमिका बजावली. भारतीय संघाने या विजयासह पहिल्या पराभवाची परतफेड केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे उभयसंघात होणारा तिसरा आणि अंतिम सामना चांगलाच रंगतदार होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्यासाठी उतरलेल्या भारताच्या महिला संघाने 292 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिका रावल 25 धावांवर माघारी परतल्यानंतर भारतीय संघाचे गडी बाद होण्याचे सत्र सुरू राहिले. हर्लीन देओल (10) व कर्णधार हरमनप्रीत कौर (17) या झटपट बाद झाल्या. जेमिमा रॉड्रीग्ज ताप आल्याने या मालिकेला मुकली आहे. त्यामुळे दीप्ती शर्मावर जबाबदारी आली आणि तिने स्मृती मंधानाला साथ दिली. स्मृती मंधानाने 132 चेंडूंत 117 धावांची खेळी केली. दीप्तीने 53 चेंडूंत 40 धावा केल्या. तसेच, रिचा घोष (29) व स्नेह राणा (24) यांनी चांगले योगदान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊनने 3, तर ॲश्लेघ गार्डनरने 2 बळी घेतले.
भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. एकीलाही अर्धशतक करता आले नाही. ऑस्ट्रेलियासाठी फक्त दोघींनाच 20 पार मजल मारता आली. तर भारताने इतरांना 17 धावांच्या आतच रोखले. कर्णधार एलिसा हिली (9) व जॉर्जिया व्हॉल (0) हे दोन्ही सलामीच्या फलंदाज झटपट बाद झाल्या. एलिसा पेरीने 44 व ॲनाबेल सदरलँडने 45 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. क्रांती गौडने 3 बळी घेतले, तर दीप्ती शर्मानेही 2 बळी टिपले. तसेच, रेणुका सिंग, स्नेह राणा, अरुंद्धती रेड्डी व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 40.5 षटकांमध्ये अवघ्या 190 धावांवर गडगडला. त्यामुळे त्यांना तब्बल 102 धावांनी हार पत्करावी लागली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला 100 हून अधिक धावांच्या फरकाने पराभूत करणारा भारत हा पहिलाच संघ ठऱला. आहे 18 वर्षांत प्रथमच भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान, भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी (दि.20) दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर पार पडणार आहे.
स्मृतीचे सर्वाधिक धावांचे योगदान
भारताच्या स्मृती मंधानाने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. या सामन्यात स्मृती मंधाना हीने शतकी खेळी केली. स्मृतीने 91 चेंडूंत 117 धावा केल्या. यादरम्यान तिने 4 षटकार आणि 14 चौकार लगावले आहेत. स्मृती व्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने देखील 40 धावांचे योगदान दिले. तसेच, इतरांनी दिलेल्या योगदानामुळे भारताच्या महिला संघाला 292 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताची ‘क्रांती'
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात क्रांती गौड हिने ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीच्या रुपात ऑस्ट्रेलिया पहिला धक्का दिला. ती 9 धावांवर माघारी फिरली. रेणुकाने सलामीची फलंदाज ज़ॉर्जियाला खातेही उघडू दिले नाही. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरलीच नाही. परिणामी संघ 190 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून क्रांती गौड हिने सर्वाधिक 3 बळी घेतले.
