भारताच्या पोरींनी मैदान मारले

बांगलादेशला नमवत घेतला बदला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

19 वर्षाखालील आशिया चषकतातील स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारातीय संघाने बांगलादेशवर मात केली आणि चषकावर आपले नाव कोरले आहे. याआधी भारतीय 19 वर्षांखालील मुलांचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. परंतु, त्यांना बांगलादेशकडून 59 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, महिलांच्या स्पर्धेत भारत-बांगलादेश पुन्हा आमने-सामने आले आणि यावेळी महिला संघाने बाजी मारली.

20 षटकांच्या या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 117 धावा केल्या होत्या. परंतु, भारताने बांगलादेशचा डाव 76 धावांवर गुंडाळला व सामन्यात 41 धावांनी बाजी मारली आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी कराताना सुरूवातीचे दोन गडी मागोमाग गमावले होते. मात्र, कर्णधार निकी प्रसाद व जी त्रिशाने तिसर्‍या बळीसाठी 41 धावांची भागिदारी करत डाव सावरला. निकीने 12 धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर जी त्रिशाने सामन्यात अर्धशतक ठोकले. तिने 5 चौकार व 2 षटकारांसह 47 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताने बांगलादेशला विजयासाठी 118 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी बांगलदेशचा डाव 18.3 षटकांत अवघ्या 76 धावांवर गुंडाळला. बांगलादेशच्या अवघ्या 2 खेळाडूंनी दुहेरी धावा केल्या. सामन्यात आयुषी शुक्लाने बांगलादेशचे 3 गडी बाद केले. तर, पौर्णिका सिसोडिया व सोनम यादव यांना प्रत्येकी 2 बळी घेण्यात यश आले. तर, जोशिथा व्हीजेला 1 बळी घेता आला.

Exit mobile version