स्मृती मानधनाची झंझावती खेळी
। बंगळूर । वृत्तसंस्था ।
भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केले आहे. श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी व दीप्ती शर्मा यांच्या प्रभावी गोलंदाजीनंतर स्मृती मानधनाच्या (90 धावा) आणखी एका धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी व 56 चेंडू राखून मात केली आहे. तसेच, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे घवघवीत यश संपादन केले.
प्रथम फंलंदाजी करणार्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 215 धावात रोखले. आफ्रिकेची कर्णधार व्होलवार्डट आणि तझमीन ब्रिट्सने शतकी सलामी दिली. कर्णधार व्होलवार्डटने 57 चेंडूत 61 धावांची तर ब्रेट्सने 38 धावांची खेळी केली. मात्र, यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत आफ्रिकेची अवस्था 5 बाद 143 धावा अशी केली. दरम्यान, नादिने क्लर्क (26) आणि रिडेर (26) यांनी चांगली खेळी करत धावसंख्या 200 पार पोहचवल्या. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.तर, श्रेयांका पाटील व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
भारताने आफ्रिकेच्या 215 धावांचे आव्हान पार करताना दमदार सुरूवात केली. स्मृती मानधना आणि शफाली वर्माने 61 धावांची सलामी दिली. शफाली 25 धावा करून बाद झाल्यानंतर प्रिया पुनियाने आक्रमक फलंदाजी करणार्या स्मृतीला चांगली साथ दिली. या दोघींनी भारताला 123 धावांपर्यंत पोहचवले. पुनियाने 28 धावा करून स्मृतीची साथ सोडली. दरम्यान, स्मृती ही आपल्या सलग तिसर्या शतकाच्या दिशेने कूच करत होती. हरमनसोबत स्मृतीने भारताला 170 धावांच्या पार पोहचवले. ती देखील 90 धावांवर पोहचली होती. मात्र, मलाबाने स्मृतीला बाद करत तिची शतकांची हॅट्ट्रिक होऊ दिली नाही. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर हरमनप्रती कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी भारताला 200 धावांच्या पार पोहचवले. हरमनप्रीत कौरने 42 तर जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद 19 धावा केल्या. कौर बाद झाल्यावर रिचा घोषने षटकार मारत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका 3-0 अशी खिशात टाकली. आता हे दोन्ही संघ 28 जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहेत. त्यानंतर 5 जुलैपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
स्मृतीने रचला आणखी एक इतिहास भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे. स्मृती तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 127 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्या एकदिवसीय सामन्यात 120 चेंडूत 136 धावांची खेळी खेळली. यानंतर स्मृतीने तिसर्या सामन्यात 90 धावा ठोकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.