| चँगझाऊ | वृत्तसंस्था |
भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी मंगळवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी या तिन्ही प्रकारात पराभव झाला. त्यामुळे सर्वांचेच आव्हान संपुष्टात आले. प्रणॉय, लक्ष्य सेन, प्रियांशू राजवत यांचा पुरुषांचा एकेरीत; तर एम.आर.अर्जुन-ध्रुव कपिला यांचा पुरुषांच्या दुहेरीत आणि ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा महिला दुहेरीत पराभव झाला.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकलेल्या प्रणॉयचा पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव झाला. मलेशियाच्या एन.जी.योंग याने प्रणॉयवर तीन गेममध्ये विजय मिळवला. मलेशियन खेळाडूने 21-12, 13-21, 21-18 असे प्रणॉयवर यश मिळवले. भारतीय खेळाडूचा एक तास व सहा मिनिटांत पराभव झाला. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसन याने लक्ष्यची झुंज 23-21, 16-21, 21-9 अशी मोडून काढली. लक्ष्यचा एक तास व 18 मिनिटांमध्ये पराभव झाला. शेसार रुस्तावितो याने प्रियांशूला 21-13, 26-24 असे हरवले.
दुहेरीतही अपयश
भारतीय खेळाडूंना दुहेरीतही अपयशाचा सामना करावा लागला. ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीला महिला दुहेरीत चेन किंग-जिया फॅन यांच्याकडून 21-18, 21-11 असा पराभवाचा सामना करावा लागला. केईचिरो मातसुई-योशिनोरी तकेऊची या जोडीने एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला या भारतीय जोडीला 23-21, 21-19 असे नमवले.