| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या 18 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने नामिबियाचा 93 धावांनी पराभव केला. या विश्वचषकात भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय होता. या सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला. टी-20 विश्वचषकात सर्वात जलद सांघिक शतकाचा विक्रम आता भारतीय संघाच्या नावावर आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात फक्त 6.5 षटकांत शतक ठोकून भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद सांघिक शतकाचा (100 धावा) नवा विक्रम प्रस्थापित केला.
या सामन्यात भारतीय संघाने फक्त 41 चेंडूत 100 धावा केल्या. यासह भारताने नेदरलँड्सचा 12 वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी 2014 मध्ये नेदरलँड्सनं आयर्लंडविरुद्ध 42 चेंडूत म्हणजेच 7 षटकांत 100 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाने रचलेला हा ऐतिहासिक विक्रम मुख्यत्वे स्फोटक सलामीवीर इशान किशनमुळे आहे. या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलं. यानंतर इशान किशन आणि संजू सॅमसननं भारताला वादळी सुरुवात मिळवून दिली.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या बॅटने मैदानात आग लावली. त्याने केवळ 20 चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण करत टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय यष्टिरक्षक म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या खेळीसह त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीचा कित्येक वर्षांचा विक्रम मोडीत काढला. इशान किशनने नामिबियाविरुद्ध 24 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. टी-20 विश्वचषकात भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाद्वारे ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी 2007 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एम.एस. धोनीने 45 धावा केल्या होत्या. तब्बल 19 वर्षांनंतर इशानने हा आकडा पार करून अव्वल स्थान पटकावले आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने गेल्या 27 सामन्यांपैकी 25 सामने जिंकले आहेत. त्यांनी फक्त एकच सामना गमावला आणि एक सामना अनिर्णित राहिला. 2023 च्या वनडे विश्वचषकात भारत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचला, परंतु अंतिम फेरीत हरला. हा त्यांचा एकमेव पराभव आहे. यानंतर, भारतानं 2024 च्या टी-20 विश्वचषकातील सर्व सामने जिंकले आणि विजेतेपद पटकावले. यानंतर, 2025 मध्ये जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आली तेव्हाही त्यांनी एकही सामना न गमावता विजेतेपद जिंकले.
सलग 10 सामन्यात विजय भारत आता जगातील पहिला संघ बनला आहे ज्यानं एकही सामना न गमावता सलग 10 टी-20 विश्वचषक सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात संघानं सलग आठ सामने जिंकले आणि त्यानंतर या वर्षी आणखी दोन सामने जिंकले. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अमेरिकेला हरवलं तेव्हा त्यांनी नऊ सामने जिंकून विक्रम प्रस्थापित केला होता, परंतु आता त्यांचे सलग विजय दहा झाले आहेत. भारतीय संघ आता 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तानला हरवून त्यांच्या विजयांची संख्या दहावरुन अकरा करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे कोणत्याही संघाला हा विक्रम मोडणे अशक्य होईल.







