भारताचे आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न भंगलं

दक्षिण आफ्रिकेचा एक डाव , 32 धावांनी विजय

| सेंच्युरियन | वृत्तसंस्था |

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. गुरुवारी (28 डिसेंबर) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 131 धावांवर सर्वबाद झाली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात 163 धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डीन एल्गर, मार्को जॅन्सेन आणि कागिसो रबाडाने मोलाचे योगदान दिले. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे .

विराट कोहलीच्या रूपाने भारताला 10वा धक्का बसला. मार्को जॅन्सेनच्या चेंडूवर त्याने अप्रतिम फटका मारला, पण धावत जाऊन कागिसो रबाडाने उत्कृष्ट झेल घेतला. विराट 82 चेंडूत 76 धावा करून कोहली बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार मारला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्नही भंगले. आता दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.

दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तसेच शुबमन गिलने 26 धावा केल्या. या दोघांशिवाय भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रेयस अय्यर सहा, यशस्वी जैस्वाल पाच, केएल राहुल चार, मोहम्मद सिराज चार आणि शार्दुल ठाकूर दोन धावा करून बाद झाला. रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. प्रसिध कृष्णा खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने चार, मार्को जॅनसेनने तीन आणि कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी डीन एल्गरने शानदार फलंदाजी केली आणि तो द्विशतकाच्या जवळ असताना 185 धावांवर तो शार्दुल ठाकूरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अश्विनने 19 धावांच्या धावसंख्येवर कोईत्झेला बाद केले. शेवटी बुमराहने रबाडाला एका धावेवर आणि नांद्रे बर्जरला शून्यावर बाद केले. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही आणि आफ्रिकेचा डाव 408 धावांवर आटोपला.

Exit mobile version