भारताच्या अभिषेक पालला पहिले कांस्यपदक

आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नॅशनल स्टेडियमवर सुरू झालेल्या 24 व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी सहा सुवर्णपदकांचा फैसला झाला. त्यापैकी तीन इव्हेंटमध्ये भारतीय थलिट्सचा समावेश होता. मात्र, भालाफेकपटू अनु राणी, पंधराशे मीटरमध्ये लिली दासने निराश केल्यानंतर पुरुषांच्या दहा हजार मीटर शर्यतीत गुलवीर सिंग व अभिषेक पाल यांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. अखेर अभिषेक पालने अंतिम क्षणी बाजी मारून ब्राँझपदक जिंकले व पहिल्या दिवशी भारताची पत राखली.

अतिशय डावपेचपूर्ण झालेली ही शर्यत जपानच्या रेन तझावाने जिंकली. त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली. केनिया सोडून कझाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या कोएच किमुताई याने तझावाचा पाठलाग करणेच पसंत केले. मात्र, 10 फेऱ्या शिल्लक असताना तो माघारला. गुलवीर सिंग व अभिषेक पाल यांनीही मागे राहणेच पसंत केले. दहा फेऱ्यांनंतर त्यांच्यासोबत जपानचा युतो इमाई धावत होता. तीन फेऱ्या शिल्लक असताना युतोने जवळजवळ दहा मीटरची आघाडी घेतली होती. यात गुलवीरची दमछाक झाली. मात्र, अभिषेकने शेवटच्या दोनशे मीटरमध्ये जोरदार वेग वाढवून अंतिम रेषेवर युतोला मागे टाकले आणि ब्राँझपदक जिंकले. गुलवीर सिंग पाचवा आला. सुवर्णपदक विजेत्या तझावाने 29 मिनिटे 18.44 सेकंद, किमुताईने 29 मिनिटे 31.63 सेकंद व अभिषेकने 29 मिनिटे 33.26 सेकंद अशी वेळ दिली.

भालाफेकीत निराशा
महिलांच्या भालाफेकीत माजी रौप्यपदक विजेत्या अनु राणीला चौथे स्थान मिळाले. तिला 59.10 मीटर अशीच सर्वोत्तम फेक करता आली. यात जपानच्या मरीना साईतोने सुवर्ण (61.67 मीटर), चीनच्या लियु शियिंगने रौप्य (61.51 मीटर) व श्रीलंकेच्या दिलहानी लेकामगेने ब्राँझपदक (60.93 मीटर) जिंकले. 2018 मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जपानच्या नोझोमी तनाकाने पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक आपल्या नावे केले. यात भारताच्या लिली दासची सातव्या क्रमांकावर घसरण झाली. यात श्रीलंकेच्या गयांतिकाने ब्राँझपदक जिंकून इतिहास घडविला.

तेजस्विनीची वाटचाल
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडीत ब्राँझपदक जिंकणारा तेजस्विन शंकर गेल्या दीड वर्षापासून डेकॅथलॉनमध्ये नशीब अजमावत असून प्रथमच प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत आहे. दहा क्रीडा प्रकारांपैकी पहिल्या दिवशी शंभर मीटर, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी व चारशे मीटर हे पाच क्रीडा प्रकार पूर्ण झाले. यानंतर तेजस्विन 4124 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने पहिल्या दिवशी 11.30 सेकंद (शंभर मीटर), 7.48 मीटर (लांब उडी), 12.39 मीटर (गोळाफेक), 2.14 मीटर (उंच उडी) व 49.57 सेकंद (चारशे मीटर) अशी कामगिरी केली.

महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत मुंबईकर ऐश्वर्या मिश्राने प्राथमिक फेरीत अव्वल स्थान मिळविताना 53.58 सेकंद अशी वेळ दिली. या कामगिरीमुळे ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत राजेश रमेश व महम्मद अजमल यांनीही अंतिम फेरी गाठली राजेशने उपांत्य फेरीत तिसरे स्थान मिळविताना 45.91 सेकंद, तर अजमलने दुसऱ्या उपांत्य शर्यतीत चौथे स्थान मिळविताना 45.75 सेकंद अशी वेळ दिली.

Exit mobile version