। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अंडर 14 वयोगटातील प्रतिभावान फुटबॉलपटूना शोधून काढण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम सुरु झाली आहे. इंडियन टायगर आणि इंडियन टायग्रेसेस असं या मोहिमेच नाव आहे. तज्ज्ञांच्या मदतीने जागतिक स्तरावर भारताची फुटबॉलमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणं, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. अंगी फुटबॉल खेळण्याच कौशल्य असलेल्या मुला-मुलींना शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण देणं, संधी देणं आणि व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन देण हा या मोहिमेमागे उद्देश आहे. एका भव्य-दिव्य कार्यक्रमात आज या मोहिमेचा शुभारंभ झाला.
या टॅलेंट हंटमध्ये जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू सुद्धा सहभागी होणार आहेत. बरुण दास यांनी या उपक्रमामागची संकल्पना समजावून सांगितली. या मोहिमेमुळे भारतीय फुटबॉलला एक नवी दिशा मिळेल. भारतात फुटबॉल खेळणार्यांसाठी ही मोठी संधी आहे. युवा फुटबॉलपटूना जागतिक स्तरावर ओळख मिळेल. छोट्या वयातच करिअरमध्ये त्यांना एक मोठी झेप घेता येईल. या उपक्रमामुळे खेळाडूंसाठी नवे दरवाजे उघडतील. त्यांची हजारो स्वप्न साकार होतील असं बरुण दास म्हणाले.
टॅलेंट हंटचा हा कार्यक्रम एप्रिल ते जुलै पर्यंत चालणार आहे. या खास इव्हेंटमध्ये जर्मनीतील दिग्गज फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत. जर्मन फुटबॉल असोसिएशनमध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया प्रमुख काय डॅमहॉल्ज, बुंडसलीगामधून पीटर लायबल, रीस्पोचे सीईओ गेरहार्ड रीडल, आशिया आणि युरोपमध्ये महिला फुटबॉलला नव्या उंचीवर घेऊन जाणारी जूलिया फार, जर्मनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेचे डॉ आंसेम कूच्ला, स्ट्रायकरलॅब्सचे सीईओ फिलिप क्लॉकल आणि वेलेंटीना पुत्ज सुद्धा या आयोजनात सहभागी होणार आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये एक कठीण निवड प्रक्रिया होईल. 20 खेळाडू आणि 20 स्टँडबायची यामध्ये निवड करण्यात येईल. हे खेळाडू मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होतील. या खेळाडूंना ऑस्ट्रिया आणि जर्मनीला पाठवण्यात येईल. त्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी जर्मनीच्या सुपरकप फायनलमध्ये 40 विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.