भारताचा लाजिरवाणा पराभव

दक्षिण अफ्रिकेचा रोमांचक विजय; मालिकेत 1-1 ची बरोबरी

| रायपूर | वृत्तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेने बुधवारी (दि.3) रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 4 गडी राखून रोमांचक विजय मिळवला आहे. एडेन मार्करमच्या शतकाने आणि मॅथ्यू ब्रिट्सके व डेवाल्ड ब्रेव्हिसच्या अर्धशतकांनी दक्षिण आफ्रिकेचा विजय साकारला. भारताने दिलेल्या 359 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता विशाखापट्टणमला होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावत 49.2 षटकात पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेने मायदेशाबाहेर पहिल्यांदाच एकदिवीय समान्यात एवढा मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात एडेन मार्करमने शतकी खेळी केली, तर मॅथ्यू ब्रिट्सके आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी अर्धशतके करत मोलाचे योगदान दिले. तसेच, दवाचाही परिणाम या सामन्यावर दिसून आला. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना गोलंदाजी करताना प्रचंड अडचणी आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि एडेन मार्करम यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, डी कॉकला फार काळ टिकू शकला नाही. तो 8 धावांवरच बाद झाला. त्यानंतर मार्करमने कर्णधार तेंबा बावुमाला साथीला घेत धावांचा ओघ कायम ठेवताना शतकी भागीदारी केली.

अखेर त्यांची 101 धावांची भागीदारी 21 व्या षटकात तूटली. यावेळी तेंबा बावुमा 46 धावांवर बाद झाला. यादरम्यान, मार्करमने अर्धशतक केले होते. बावुमा बाद झाल्यानंतर मार्करमने मॅथ्यू ब्रिट्सकेसोबत डाव पुढे नेत 70 धावांची आक्रमक भागीदारी झाली. यादरम्यान, मार्करमने शतकही पूर्ण केले; परंतु, तो 110 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिसने ब्रिट्सची साथ दिली. या दोघांनीही 92 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा विजय आणखी सोपा केला. यादरम्यान, दोघांनीही अर्धशतके ठोकली. मात्र, 41 व्या षटकात ब्रेव्हिस 54 धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्रिट्सके आणि टोनी डी झोर्झीने संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. अखेर ब्रिट्सके देखील 68 धावांवर बाद झाला. त्यानंतर टोनी डी झोर्झी 17 धावांवर असताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला, तर त्याआधी मार्को यान्सिनचा 2 धावेवरच बाद झाला. शेवटी कॉर्बिन बॉश (26) आणि केशव महाराज (10) यांनी उर्वरित धावा पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने 50 षटकात 5 बाद 358 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने सलामीवीर यशस्वी जैस्वाल (22) आणि रोहित शर्मा (14) लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी 195 धावांची मोठी भागीदारी केली. या दोघांनी शतकही ठाकले. यावेळी विराट कोहलीने 102 धावा केल्या. तर, ऋतुराजने 105 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतरही कर्णधार केएल राहुलने नाबाद 66 धावांची खेळी केली. तर, रवींद्र जडेजाने नाबाद 24 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सिनने 2 बळी घेतले. तर, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Exit mobile version