पहिल्या 2 वनडेत राहुल कर्णधार; अश्विन आणि सुंदरला संधी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सोमवारी संध्याकाळी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यासाठी केएल राहुल कर्णधार असेल. विश्वचषक संघातील पाच खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
अक्षर दुखापतीमुळे पहिले 2 एकदिवसीय सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे. तिसऱ्या एक दिवसीय सामन्यासाठी सर्व वरिष्ठ खेळाडू परततील. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन दिवसांची दिवसांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथील पीसीए मैदानावर होणार आहे.
ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा पहिल्या 2 एक दिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पाचही खेळाडू विश्वचषक संघाचा भाग नाहीत. अक्षर पटेल जखमी आहे, त्यामुळे त्याच्या जागी अश्विन आणि सुंदर या दोघांना संधी मिळाली आहे. रोहित, कोहली, हार्दिक, कुलदीप आणि अक्षर तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करतील. अश्विन आणि सुंदरलाही या सामन्यासाठी जागा मिळाली आहे. मुख्य निवडकर्ता आगरकर म्हणाले, ‘अक्षर शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे सुंदर आणि अश्विनलाही त्याच्या जागी ठेवण्यात आले आहे. भारताने पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तिसऱ्या वनडेसाठी 17 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. केएल राहुल कडे 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत संघाने 4 जिंकले आणि 3 गमावले आहेत .







