प्रथमच 86.27 मीटर लांब भालाफेक
| नवी दिल्ली| वृत्तसंस्था |
भारताचा भालाफेकपटू सचिन यादव हा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 मध्ये भालाफेकीत चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याने गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यासारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. सचिनने 86.27 मीटर लांब भाला फेकून सर्वांना चकीत केले. त्याच्या या कामगिरीने त्याने भारताची आशा उंचावली आहे.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत गुरुवारी (दि.18) भारतीयांचे लक्ष पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे लागले होते. भारताचे सर्वात मोठे आशास्थान असलेला गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंतिम फेरीत खेळत होता. फक्त नीरजच नाही, तर आणखी एक भारतीय अंतिम फेरीत पोहचला होता. तो म्हणजे 25 वर्षीय सचिन यादव हा होय. मैदानात नीरज चोप्रा, अर्शद नदीन, अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबर्स यांसारखे दिग्गज मैदानात असताना सचिनची फारशी चर्चाही नव्हती. मात्र, या अंतिम फेरीनंतर त्याने सर्वांनाच त्याची दखल घ्यायला लावली आणि भारताची भविष्यासाठी आशाही उंचावली.
या अंतिम फेरीत एकिकडे नीरज आणि अर्शद हे प्रतिद्वंद्वी अंतिम 6 मध्येही जाऊ शकले नसताना, सचिन यादवने मात्र शेवटपर्यंत आशा उंचावल्या होत्या. सचिनने पहिल्याच प्रयत्नात 86.27 मीटर लांब भाला फेकला. या अंतराने त्याचे आव्हान शेवटच्या फेरीपर्यंत जिवंत राहिले. मात्र, तो सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नानंतर चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याचे कांस्यपदक फक्त 40 सेंटीमीटरने हुकले. मात्र, त्याने 86.27 मीटरचे अंतर पार केल्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद झाली. यापूर्वी त्याने एवढे लांब अंतर पार केले नव्हते.
गोल्डन बॉयकडून प्रोत्साहन
सचिन यादव सुरुवातीला क्रिकेटचा मोठा चाहता होता. तो वेगवान गोलंदाजीही करायचा. परंतु, वयाच्या 19 व्या वर्षी तो ऍथलेटिक्सकडे वळला आणि पर्यायाने भालाफेकीकडे. 6 फुट 5 इंच उंची असलेला सचिन दिसायला धिप्पाड असल्याने तो ऍथलेटिक्समध्ये चमकेल, अशी आशा होतीच. गुरुवारी नीरज चोप्रा पाचव्या फेरीनंतर 8 व्या क्रमांकावर राहिल्याने तो बाहेर पडला. असे असले तरी त्याने मैदानातच थांबून सचिन यादवचे मनोबल वाढवले होते. तो सचिनने सहाव्या प्रयत्नात थ्रो करेपर्यंत मैदानात होता. तसेच, त्याने पाचव्या फेरीनंतर सचिनची पाठही थोपटली होती.
