भारतातील राजकीय नेते, उद्योगपती दाऊदच्या रडारवर

अंडरवर्ल्डचे विशेष युनिट तयार; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा खुलासा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अंडरवर्ल्ड डॉन आणि फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिमनं भारताला लक्ष्य करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेने उघड केले आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, अनेक राजकीय नेते आणि प्रसिद्ध उद्योगपतींची नावे या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे समजतंय.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये उघड झालंय की, दाऊद इब्राहिम त्याच्या विशेष युनिटसह देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशानं स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रं वापरून देशावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. याशिवाय, दाऊद इब्राहिमचे दिल्ली आणि मुंबईवर विशेष लक्ष आहे. ईडीनं अलीकडेच दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक मदत केल्याबद्दल मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची ईडी चौकशी करणार आहे. शुक्रवारी इक्बाल कासकरला मनी लाँड्रिंग प्रकरणात 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ईडीनं न्यायालयाला सांगितलंय की, कासकरच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. कारण, तो मुख्य सूत्रधार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ईडीनं इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, तसेच गँगस्टर छोटा शकीलच्या नातेवाईकांशी संबंध असलेल्या लोकांच्या मुंबईतील 10 ठिकाणी छापे टाकले होते.

Exit mobile version