‘ऑलिम्पिक’साठी भारताचा प्रस्ताव

2036मधील स्पर्धांच्या आयोजनासाठी ‘आयओसी’ला पत्र

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

2036च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या भविष्यातील यजमान ठरविणार्‍या आयोगाला इरादा पत्र सादर करण्यात आले आहे. भारतीय अधिकारी आणि ‘आयओसी’ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनौपचारिक संवाद सुरू होता. अखेर भारताने यजमानपदाच्यादृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 1 ऑक्टोबर रोजी ‘आयओसी’ला पत्र पाठविल्याचे क्रीडामंत्रालयातील सूत्राकडून सांगण्यात आले. ‘भारतासाठी ही खूप मोठी संधी ठरू शकेल. आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि देशभरातील युवकांचे सक्षमीकरण यासाठी ऑलिम्पिक यजमानपदाचा फायदा होऊ शकेल, असेही सूत्राने नमूद केले.

सरकारने 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या त्यांच्या सरकारच्या आकांक्षेबद्दल सर्वप्रथम गतवर्षी भाष्य केले होते. तसेच त्यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात ऑलिम्पिक आयोजनाच्या इच्छेचा पुनरुच्चार केला होता.

पुढील वर्षी ‘आयओसी’च्या निवडणुका होणार असून त्यानंतरच यजमानपदाबाबत निर्णय घेतला जाईल. भारताने ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली असली, तरी सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की या देशांचे आव्हान असणार आहे. इरादा पत्र सादर केल्यामुळे, भारताने ‘अनौपचारिक संवादा’पासून यजमान निवड प्रक्रियेच्या ‘निरंतर संवाद’ टप्प्यापर्यंत प्रगती केली आहे. या टप्प्यात, ‘आयओसी’कडून संभाव्य यजमान देशांतील खेळांशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा अभ्यास केला जातो. या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात कोणत्या वर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवायचे आहे, त्यासाठी औपचारिक बोली सादर करणे आवश्यक असेल. याचे मूल्यमापन ‘आयओसी’ च्या भविष्यातील यजमान ठरविणार्‍या आयोगाद्वारे केले जाईल.

‘आयओसी’ अध्यक्षांचा पाठिंबा
ऑलिम्पिक यजमानपदाच्या भारताच्या प्रयत्नांना ‘आयओसी’चे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र, बाख यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांची भारताप्रति काय भूमिका राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अहमदाबादला पसंती?
भारताला 2036च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यास ही स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित केली जाईल, अशी चर्चा आहे. भारताने यापूर्वी इतक्या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2010 मध्ये केले होते. त्यावेळी नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच 1951 आणि 1982 साली आशियाई क्रीडा स्पर्धाही नवी दिल्ली येथे झाल्या होत्या.
Exit mobile version