भारताची फुलराणी निवृत्त!

सायना नेहवालचा मोठा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दिग्गज बॅटमिंटन खेळाडू भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने मोठा निर्णय घेतला आहे. तिने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबत सायनाने एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे. तिने सांगितले की, तिच्या गुडघ्यामध्ये असलेल्या वेदनेमुळे तिच्यासाठी आता खेळणे शक्य नाही. तिने शेवटची स्पर्धा 2023 मध्ये सिंगापूर ओपन खेळली होती. त्याआधी सायनाने 2012 मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते.

सायना नेहवालने पॉडकास्टमध्ये सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वीच खेळणे बंद केले आहे. मी माझ्या अटींवर खेळायला सुरुवात केली होती आणि माझ्या अटींवरच खेळणे सोडले आहे. त्यामुळे मला निवृत्तीची घोषणा करणे गरजेचे वाटले नाही. सायनाच्या मते तिच्या गुडघ्यातील कार्टिलेज पूर्ण खराब झाले असून तिला संधिवात झाला आहे. ती म्हणाली, जेव्हा तुम्ही खेळू शकत नाही, तेव्हा तुम्ही थांबायला हवे. मी पहिल्या 8-9 तास सराव करायची, परंतु आता माझे गुडघे 1-2 तासातच उत्तर देऊन टाकतात. त्यानंतर सुज येते. त्यामुळे मी विचार केला की आता खूप झाले. मी माझी कारकिर्दी आणखी ताणू शकत नाही.

सायना नेहवालला 2016 ऑलिम्पिकदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोठा फटका बसला होता. परंतु, त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करत 2017 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य आणि 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. मात्र, त्यानंतर तिला सातत्याने गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. सायनाने 2024 मध्येच जाहीरपणे तिला संधिवात असल्याचे सांगितले होते. सायनाने जेव्हा 2012 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, तेव्हा ती ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. तिने तीनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळली आहे. ती 2008 मध्ये जेव्हा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिंकली होती, तेव्हा प्रकाशझोतात आली होती. त्यावर्षी ती पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळली होती. 2009 मध्ये तिने सुपर सिरीजही जिंकली होती. 2010 साली तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. सायनाचा 2009 मध्ये अर्जुन पुरस्काराने आणि 2010 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

Exit mobile version