अवघ्या सहा दिवसांत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा केला विक्रम
| पॅरिस | वृत्त्तसंस्था |
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अॅथलिटने 6 दिवसांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 20 पदकांचा टप्पा गाठून भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास रचला आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 20 पदके आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे.
पॅरिसपूर्वी भारताने टोकियो 2020 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण 19 पदके जिंकली होती. पण आता पॅरिसमध्ये पहिल्या 6 दिवसातच भारतीय पॅरा अॅथलिट्सने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 4 खेळांमध्ये पदकं जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 10 पदकं अॅथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये 5 तर नेमबाजीत 4 पदके आली आहेत. तिरंदाजीतून एक पदक मिळाले आहे. भारताने 3 सप्टेंबरला म्हणजेच सहाव्या दिवशी 5 पदकं जिंकली. दीप्ती जीवनजी, शरद कुमार, मरियप्पन थांगावेलू, अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांनी ही पदकं जिंकली.
बुधवारी, पुरुषांच्या भालाफेक फायनलमध्ये, अजित सिंगने 65.62 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले आणि सुंदर सिंग गुर्जरने 64.96 मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले दुहेरी पदक होते.
पुरुषांच्या उंच उडी फायनलमध्ये भारताच्या दोन्ही खेळाडूंनी पदकं जिंकली. शरद कुमार (42) याने 1.88 मीटरच्या सर्वोत्कृष्ट उडीसह रौप्य पदक जिंकले आणि 42 प्रकारात नवीन पॅरालिम्पिक विक्रमही केला. शरदने टोकियो 2021 मध्ये जिंकलेल्या कांस्यपदकाचे पॅरिस 2024 मध्ये रौप्यपदकात रूपांतर केले. तर, मरियप्पन थांगावेलू (42) याने 1.85 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले.
2008 बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावता आले नाही आणि 2012 लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले. 2016च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने 4 पदके जिंकली होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदकं जिंकून नवा विक्रम घडवला होता.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी
भारत 1968 पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खातेही उघडले नव्हते. यानंतर 1972 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले. भारताने पुढच्या 2 पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही, पण 1984 मध्ये भारतीय पॅरा अॅथलिट 4 पदकं जिंकण्यात यशस्वी झाले. यानंतर पुन्हा एकदा भारताला पुढील 4 पॅरालिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यानंतर 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताने 2 पदकांची कमाई केली होती.







