विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक; प्रतिका-स्मृतीची तुफान आतषबाजी
| मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीसमोर डीएलएस पद्धतीने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयाने भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत स्थान निश्चित झाले.
न्यूझीलंड हॅलिडेने 84 चेंडूत 81 धावा केल्या तर गेजने एक छोटीशी खेळी केली. 44 षटकांत 325 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडनं 8 बाद 271 धावा केल्या. स्मृती मानधना (95 चेंडूत 109) आणि प्रतीक रावल (134 चेंडूत 122) यांच्या शतकांच्या आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या 55 चेंडूत नाबाद 76 धावांच्या जोरावर भारतानं 49 षटकांत 3 बाद 340 धावा केल्या.
भारताच्या डावातील 48 व्या षटकानंतर अचानक आलेल्या पावसामुळे सामना दोनदा विस्कळीत झाला. पहिला सामना भारताच्या डावातील 48 व्या षटकानंतर झाला होता. मैदान ओले असल्याने एक तासाचा घेऊन सामना 49 षटकांपर्यंत कमी करण्यात आला. 10 मिनिटांच्या मध्यांतरात पुन्हा एकदा व्यत्यय आल्यानंतर सामना 44 षटकांपर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर न्यूझीलंडला 325 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आलं. पण, न्यूझीलंडला हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. क्रांती गौडने दुसऱ्या षटकात सलामीवीर सुझी बेट्सला 1 धावेवर माघारी पाठवित न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर 44 षटकात 325 धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली. पण धावांचे अंतर खूपच जास्त असल्याने न्यूझीलंडचा पराभव निश्चित होत गेला. न्यूझीलंडचा संघ 8 विकेट गमवून 271 धावा करू शकली. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. पण अजूनही एक चमत्कारीक समीकरण आहे. पण हे समीकरण जुळून येणं कठीण आहे.
भारताने दिलेले आव्हान गाठताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्का बसला. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सुजी बेट्स बाद झाली. अवघी एक धाव करून तिला तंबूत परतावे लागले. त्यानंतर एमेलिया केर आणि जॉर्जिया डिव्हाईन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. ही जोडी रेणुका सिंगने फोडली. सोफी डिव्हाई मैदानात आली पण काही खास करू शकली नाही. 6 धावांवर असताना रेणुका सिंगने तिचा त्रिफळा उडवला. पण चौथ्या विकेटसाठी भारतीय संघाला खूपच झुंज द्यावी लागली. एमलिया केर आणि ब्रूक हालिडे यांनी 56 धावांची भागीदारी केली. स्नेह राणाने एमेलिया केरची विकेट काढली आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.
मॅडी ग्रीनही काही खास करू शकली नाही. 18 धावांवर असताना बाद झाली आणि न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. विकेट पडल्यानंतर धावांचे अंतर वाढत गेलं. तसेच न्यूझीलंडवरील दबाव वाढत गेला. ब्रूक हालिडेने 84 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. पण तिची विकेट पडली आणि सामना भारताच्या हातात पूर्णपणे गेला. भारताची उपांत्य फेरीतील जागा निश्चित झाली आहे. पण अजूनही न्यूझीलंड आणि श्रीलंकेकडे संधी आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी, श्रीलंकेचा शेवटचा सामना पाकिस्तानशी आणि भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना गमावला तर या दोन संघांना चमत्कारीक संधी मिळू शकते. शेवटचा सामना या दोन्ही संघांनी जिंकला तर भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 6 गुण होतील. पण नेट रनरेटच्या आधारावर चौथा संघ भारतच असू शकतो असे समीकरण आहे. भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे भारताने सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर तिकीट मिळेल.
दमदार पुनरागमन
भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. परंतु, नंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन पराभवांना सामोरं जावे लागले. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना करो या मरो अशी परिस्थिती होती. या निर्णायक सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि नंतर उत्कृष्ट गोलंदाजी शिस्त दाखवत न्यूझीलंडला हरवून दोन महत्त्वाचे गुण मिळवले. अशा प्रकारे, भारतानं उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले.
