भारताचा खणखणीत विजय

उपांत्य फेरीतील स्थान पक्के

। डंबुला । वृत्तसंस्था ।

महिला आशिया कप 2024 स्पर्धेत रविवारी (दि.21) भारतीय संघाने संयुक्त अरब अमिराती संघाला 78 धावांनी विजय मिळवला. हा भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

युएईने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 201 धावा केल्या होत्या. भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. स्मृती मानधना तिसर्‍याच षटकात 13 धावांवर झेल बाद झाली. यानंतर पॉवरप्ले संपण्याच्या आधीच आक्रमक खेळणारी शफाली वर्मा आणि दयालन हेमलता बाद झाली. शफालीने 18 चेंडूत 37 धावा तर हमलताने 2 धावा केल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने जेमिमाह रोड्रिग्ससह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण जमिमाह 14 धावा करून बाद झाली. परंतु यानंतर हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली. भारतीय संघाने 106 धावांवर 4 गडी गमावलेले असताना या दोघींनी 75 धावांची भागीदारी केली. पण 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरमनप्रीत 66 धावांवर धावबाद झाली. ऋचा घोषने नाबाद 64 धावा ठोकल्या. याशिवाय शफाली वर्माने 37 धावांची खेळी केली. युएईकडून काविशा एगोडागेने 2 बळी घेतले. तसेच, समायरा धंधारका आणि हीना होतचंदानी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

भारतीय संघाने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईची फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. रेणुका सिंग ठाकूर, पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी सुरुवातीलाच मोठे धक्के त्यांना दिले होते. त्यांनी 36 धावांवरच 3 गडी गमावले होते. पण त्यानंतर कर्णधार ईशा ओझाला काविशा एगोडागेची साथ मिळाली. त्यांनी 40 धावांची भागीदारी केली. मात्र, असे असले तरी त्यांना धावगती नियंत्रित ठेवता आली नाही. त्यातच पदार्पण केलेल्या तनुजा कन्वरने ईशाला 38 धावांवर माघारी धाडले. एका बाजूने काविशाने लढत होती. मात्र, कोणाकडूनही तिला साथ मिळाली नाही. त्यामुळे अखेर युएईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताकडून दिप्ती शर्मा हिने 2 बळी घेतले. तर, रेणुका ठाकूर, तनुजा कन्वर, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

ऋचाची फटकेबाजी
ऋचाने 29 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. तिने 12 चौकार आणि 1 षटकार असून होतचंदानीच्या गोलंदाजीवर सलग 5 चौकार ठोकले आहेत. तसेच, ऋचा महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत अर्धशतक करणारी भारताची पहिली यष्टीरक्षक फलंदाज ठरली आहे. यापूर्वी महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम सुलक्षणा नाईकने केला होता.
हरमनप्रीतचे खणखणीत अर्धशतक
हरमनप्रीतने प्रथम जेमिमाह रोड्रिग्ससह अर्धशतकी भागीदारी केली. जेमिमाह बाद झाल्यानंतर ऋचा घोष सोबत 75 धावांची भागीदारी केली. दरम्यान, हरमनप्रीतने खणखणीत अर्शशतक ठाकले आहे. तिने 47 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटाकरासह 66 धावांची आक्रमक खेळी केली.
Exit mobile version