| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यात जमा झाले आहेत. न्यूझीलंडने शुक्रवारी वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत 9 विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारतासह पाकिस्तानलाही मोठा धक्का बसला आहे. किवींनी 57 धावांचे लक्ष्य 1 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. या विजयासह न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे आणि पाकिस्तान व भारत यांची घसरण झाली आहे.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या 205 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 9 बाद 278 धावांवर डाव घोषित करावा लागला. त्यांचा गोलंदाज ब्लेअर टिकनर दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. विंडीजला दुसऱ्या डावात 128 धावा करता आल्या. जेकब डफीने 5, तर मिचेल राएने 3 विकेट्स घेतल्या. किवींसमोर 57 धावांचे माफक लक्ष्य विंडीजला ठेवता आले. 10 षटकांत त्यांनी ते पार केले.
2027 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत अपराजित आहे आणि पाच सामने जिंकून ते तालिकेत 100 टक्क्यांसह अव्वल स्थानी आहेत. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यावर 2-0 असा दणदणीत विजय मिळवून 75 टक्के मिळवून दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंका 66.67 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान (50 टक्के) व भारत (48.15 टक्के) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर होते. आता दोन्ही संघ एक स्थान खाली घसरले आहेत. न्यूझीलंड 66.67 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आला आहे. विंडीजचा संघ 4.76 टक्क्यांसह नवव्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाला आता एकूण 9 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी 7 सामने जिंकल्यास भारताची टक्केवारी 62.96 इतकी होईल, जर 8 सामने जिंकल्यास 68.52 टक्के होतील. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळायची असल्यास त्यांना किमान 7 किंवा 8 कसोटी जिंकाव्या लागतील.
भारताचा फायनलचा मार्ग अवघड!

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606